२१ मार्च रोजी जुनी पेंशन संघटनेचा आक्रोश मोर्चा – जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे
शिक्षणसेवक पद रद्द करा,यासह शिक्षकांच्या अनेक मागण्याचा होणार शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आक्रोश!
कोल्हापूर/प्रतिनिधी
शिक्षणसेवक पद रद्द करा,सन १९८२ / ८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी,गोर गरिबांच्या शाळा बंद करणारा संचमान्यतेचा अन्यायी निर्णय बदलावा,आश्वासित योजना लागू करावी,तसेच टप्पा अनुदान शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासह अनेक मागण्या कायम ठेवत जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी प्राथमिक, महानगरपालिक,नगरपालिका शिक्षक व सेवकांच्या वतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या वतीने शुक्रवार दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयावर लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे म्हणाले,लक्षवेधी आक्रोश आंदोलनामध्ये शिक्षण सेवक पद रद्द व्हावे, डीसीपीएस धारक प्राथमिक, माध्यमिक, खाजगी प्राथमिक, नगर पालिका, महानगर पालिका शिक्षकांना मार्च २०२१नंतर डीसीपीएस रक्कमेवरील व्याज व शासन हिस्सा अनुदान मिळावे, अनुकंपा आणि कुटुंब निवृत्ती वेतन बाबतची कार्यवाही तात्काळ व्हावी, १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा अन्यायी शासन निर्णय रद्द व्हावा,सातव्या वेतन आयोगातील वरीष्ठ वेतन श्रेणी त्रुटी दुरुस्त व्हावी, शिक्षकासाठी १०, २०, ३० आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, अनुकंपा शिक्षकासाठी टीईटी ची अट रद्द व्हावी, यासह अनेक मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा शुक्रवार दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वा. टाऊन हॉल ते शिक्षण उपसंचालक कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या आक्रोश मोर्चास जिल्ह्यातील सर्व संघटना,शिक्षक, शिक्षणसेवक यांनी उपस्थित रहावे असेही आवाहन धनवडे यांनी केले.
या आंदोलनाला शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षक संघटना,मुख्याध्यापक संघ,शिक्षक संघ थोरात गट,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना,पुरोगामी शिक्षक संघटना, कास्ट्राइब शिक्षक संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, शिक्षक महासंघ,उर्दू शिक्षक संघटना,शिक्षक भारती तसेच सर्व नपा, मनपा,खाजगी,अनुदानितच्या सर्व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.,असे ते म्हणाले.
पत्रकार बैठकीस संघटनेचे जिल्हा सल्लागार तथा शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे,कार्याध्यक्ष बालाजी पांढरे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, जिल्हा मीडियाप्रमुख मारुती फाळके, महिला जिल्हाध्यक्षा आरती पोवार,बी एल कांबळे उपस्थित होते.










