May 14, 2026

कोल्हापूरला देशात अव्वल बनवण्याचा संकल्प करूया- पालकमंत्री प्रकाश आबिटकर; जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक, मुख्यमंत्री सुंदर शाळा पुरस्काराचे शानदार वितरण

0
IMG-20251007-WA0105(2)

कोल्हापूरला देशात अव्वल बनवण्याचा संकल्प करूया-
पालकमंत्री प्रकाश आबिटकर;

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक, मुख्यमंत्री सुंदर शाळा पुरस्काराचे शानदार वितरण

कोल्हापूर/मारुती फाळके

अभिनव शैक्षणिक प्रयोग राबवून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून राज्यात व देशात कोल्हापूर जिल्ह्याची गुणवत्तापूर्ण ओळख निर्माण केली आहे. त्यासाठी शिक्षक-शाळा-पालक-व्यवस्थापन समिती -प्रशासन यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आता कोल्हापूरला देशात अव्वल बनवण्यासाठी सर्वांनी मिळून आपल्या जिल्ह्याला देशातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनवण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.ते जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा आदर्श शिक्षक, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले,आदर्श
शिक्षक पुरस्कार वितरण हा शिक्षकांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो हाच सन्मानाचा क्षण पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी असतो. समर्पित भावनेने केलेले काम भविष्यकाळासाठी ऊर्जादायी असते. शिक्षकांच्या हातून चांगलं काम व्हावं आणि ते करत आहे. राज्य व केंद्र शासनाच्या मिशन अंकुर,मिशन उत्कर्ष, परख राष्ट्रीय सर्वेक्षण, पीजीआय- परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स, या उपक्रमात राज्य आणि देशपातळीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा सन्मान झाला आहे.

पंजाब राज्यातील बरनाला हा जिल्हा पीजीआय सर्वेक्षणात प्रथम क्रमांकावर आहे. बरनाला व कोल्हापूर जिल्ह्यात केवळ २३ गुणांचा फरक आहे.ही २३ गुणांची आघाडी भरून काढण्यासाठी सर्वांनी देशात कोल्हापूरला प्रथम क्रमांकावर येण्यासाठी काम करावे.शाळांच्या प्रगतीसाठी ११० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वीच्या षटकोनी शाळा या पावसाळ्यामध्ये बसण्यायोग्य राहत नाहीत. त्यामुळे या षटकोनी शाळांची रचना बदलून भविष्यामध्ये सर्व शाळा भौतिक सुविधांनी परिपूर्ण होतील.यासाठी भरीव निधीची तरतूद शासनाने केली आहे. पुरस्कारांमुळे शैक्षणिक गुणवत्तेचे महत्त्व वाढते. भविष्यामध्ये”आदर्श शिक्षक पुरस्कार याचे ऑनलाईन मूल्यांकन होईल.” सर्वांनी समर्पित भावनेने काम करूया. आणि सर्वच आदर्श शिक्षकांनी आपापल्या ठिकाणी गुणवत्तेचे काम करून आपल्या शाळा- जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण करूया असे पालकमंत्री आबिटकर म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या दोन वर्षांमध्ये ५ सप्टेंबर रोजी घोषित झालेल्या पुरस्कारांचे वितरण आज होत आहे. हे उशिरा झाले असले, तरी आता येथून पुढे ते ५ सप्टेंबर रोजीच व्हावे यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहावे. ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक आणि शाळांना पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्याकडून इतर शिक्षक, शाळांनी आदर्श घेऊन अधिक गुणवत्तापूर्ण प्रकारे काम करावे. हा पुरस्कार म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचा सन्मान आहे,.असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा हे अभियानही तितकेच
महत्त्वाचे असून, त्यामध्येही जिल्ह्याचे उत्कृष्ट काम सुरू आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांसाठी ११० कोटींचा निधी मंजूर असून, त्याचेही काम सुरू आहे. किरकोळ दुरुस्ती केल्यास वापरात येऊ शकतील अशा शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

आ. अशोकराव माने म्हणाले, जिल्ह्यातील शाळांचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. माझी शाळा सुंदर शाळा योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत असून, त्याचे श्रेय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जाते. त्यांना पालकमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांनी चांगले सहकार्य केले आहे.

प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले.
ते म्हणाले,कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या यशाचे श्रेय शिक्षकांना जाते.राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अभियानात कोल्हापूर ने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.१००% शाळांत cctv आहे.राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात सरस कामगिरी केली आहे.माझा शिक्षक-माझ्या मुलांचं भवितव्य आहे.शिक्षकांसाठी उत्कृष्ट पदोन्नती चे धोरण राबवून शिक्षकांना न्याय देण्याचे काम झाले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डेकर यांनी ई-जीपीएफ प्रणाली बाबत मार्गदर्शन केले. रजिस्टर मोबाईल वरून एका क्लिकवर भविष्य निर्वाह निधीची माहिती संगणकीय प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचा कर्मचारी घेऊ शकतो.ई- जीपीएफ प्रणालीचे पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. आकुर्डीकर म्हणाले ई-जीपीएफ संगणक प्रणालीमुळे भविष्य निर्वाह निधीचे काम अद्ययावत झाले असून १०००कोटी रुपयांचे लेखांकन या ऑनलाइन प्रणाली द्वारे पूर्ण झाले आहे. यामुळे भविष्य निर्वाह निधीचे कार्य काम सुलभ होण्यास मदत झाली आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सचिन मगर, डी. एस. कौशल यांनी राज्यगीत सादर केले. माजी जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, लेखाधिकारी अतुल आकुर्डे, पशुसंवर्धन अधिकारी बाबर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, उपशिक्षणाधिकारी रत्नप्रभा दबडे,उदय सरनाईक, रामचंद्र कांबळे, रवींद्र ठोकळ,गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार आदी उपस्थित होते.,

यावेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त रवींद्र केदार व दत्तात्रय घुगरे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संदीप मगदूम,सविता कुंभार यांनी केले.

चौकट-१.
पालकमंत्र्यांनी केले शिक्षण विभागाच्या कामाचे कौतुक!

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध अभियानामध्ये सरस कामगिरी करून कोल्हापूर जिल्ह्याला सतत सन्मान मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिक्षण विभागाच्या कार्यकुशल शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी झिरो पेंडन्सी च्या तत्त्वावर काम करत कोणतीही फाईल पेंडिंग ठेवलेली नाही.प्रशासकीय कौशल्याने कामाचा निपटारा करण्यात त्यांचा हातखंडा आहे.पदोन्नती प्रक्रिया, शासन स्तरावरील विविध उपक्रम- शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये सरस कामगिरी केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व विभाग प्रमुख मीना सेंड शेंडकर यांचे परिश्रम असल्यामुळेच हे यश संपादन करता आले. शेंडकर यांनी शासननिर्णय व न्यायालयीन प्रक्रिया यांचा अभ्यास करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विक्रमी पातळीवर पदोन्नती प्रक्रिया राबवून शिक्षकांना सेवेच्या उत्तरार्धात सन्मान दिल्याचेही आबिटकर यांनी सांगितले.शिक्षणाधिकारी यांच्या कामाच्या शैलीचे त्यांनी कौतुक केले.

चौकट-२.

दान दिल्याने ज्ञान वाढते..
–आदर्श शिक्षक मारुती देवेकर यांचे ‘आदर्शपण’

वि.म. सोनाळी ता. भुदरगड शाळेचे उपक्रमशील शिक्षक मारुती देवेकर यांनी स्वतःची तब्बल ६३ लाख रुपये किमतीची ९ गुंठे जमीन शाळा इमारत आणि क्रीडांगणासाठी बक्षीसपत्र देऊन समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. शाळेमध्ये गुणवत्तेबरोबरच शैक्षणिक तंत्रज्ञानाने समृद्ध शाळा व वर्गखोली बनवण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा,लोकसहभागातून शाळेचा कायापालट, मिशन अंकुर यामध्ये उल्लेखनीय कार्य करून कार्याचा ठसा निर्माण केला आहे. सध्याच्या मोहजालाच्या जमान्यांमध्ये स्वतःची ९ गुंठे जमीन ज्ञानदानाच्या मंदिरासाठी देऊन समाजासाठी खरेखुरे आयडॉल असल्याचे मारुती देवेकर या ध्येयवेड्या शिक्षकाने करून दाखविले आहे.

सन २०२४/२५ सालातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
१.श्रीम. अर्थना मारुती म्हांगोरे
आजरा
वि.मं. शेळप

२. मारुती गणपती देवेकर-भुदरगड
वि.मं. सोनाळी
३.श्रीम. किती सुधीर पाटील
वि.मं. तडसिनहाळ-चंदगड
४.श्रीम. वैशाली पांडुरंग भोईटे
गडहिग्लज-वि.मं. हसूरचंपू
५.श्रीम. छाया मधुकर चौगुले
कागल-वि.मं. म्हाकवे
६.श्री. बंडोपंत केशव पाटील
राधानगरी-वि.मं. राधानगरी

७.श्री. राजमोहन जगन्नाथ पाटील
हातकणंगले-वि.मं. भादोले नं.२
८.श्री. आनंदा पांडुरंग पाटील
करवीर-वि.मं. बाचणी

९.श्रीम. उर्मिला अनिल तेली
पन्हाळा-केंद्रशाळा वेतवडे
१०.श्री. भानुदास रामचंद्र सुतार
शाहूवाडी-वि.मं. परखंदळे

१९.श्री. महम्मदआसिफ खलील मुजावर-शिरोळ,उर्दू वि. म.घोसरवाड
१२.श्री. बाजीराव दादू जाधव
गगनबावडा-वि.मं. तळये बु.

सन २०२५/२६ आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त

१.उमाताई पंढरीनाथ लोणारकर

आजरा

२ विभागून-मारुती आण्णा डवरी
भुदरगड

वि.मं. सोनाळी
संजय यशवंत गुरव

भुदरगड
वि.मं. वेगवडे

४.श्रीम. रंजिता विठ्ठल देसूरकर
चंदगड

५ सतिश आप्पासाहेब तेली
गडहिंग्लज

६ विभागून-क्रांतिसिंह बाळकृष्ण सावंत
व- मारूती गोविंद गुरव
गगनबावडा

८ सतिश पंडीत पाटील
कागल
९ साताप्पा श्रीपती शेरवाडे
राधानगरी

१०.श्री. संतोष श्रीपाल कोळी
हातकणंगले

११.श्री. बाबुराव नामदेव निकम
करवीर

१२.श्रीम. पल्लवी विक्रम पाटील
पन्हाळा
१३.श्रीम. ललिता यशवंत माने
शाहूवाडी
१४.श्रीम, अर्पणा पोपट परीट
शिरोळ
विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२५-२६
१.राजाराम चंद्रकांत न्हायकर
राधानगरी
२. नितीन दत्तात्रय गोरे पन्हाळा
३. पूजा बाळकृष्ण तुपारे चंदगड

फोटो १.
जिल्हा परिषदेच्या शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर, व्यासपीठावर आ.अशोकराव माने,प्रसाद खोबरे,मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस,अति.सीईओ संतोष जोशी, शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर,मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डेकर व विभागप्रमुख आदी.

फोटो २. पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!