राज्यस्तरीय कार्यशाळेत “स्मार्ट टू ग्लोबल” उपक्रमाचे सादरीकरण
TRTI Pune आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ‘स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम’ मध्ये राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण…!
कोल्हापूर / प्रतिनिधी:
विद्या मंदिर यादववाडी ता. करवीर शाळेचे अध्यापक रविंद्र केदार यांनी आत्तापर्यंत वर्गात व शाळेत राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन शाळेसाठी नाविन्यपूर्ण व महत्वाकांक्षी असा ‘स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ हा प्रकल्प जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी जिल्हा नियोजन मंडळात मंजूर केला आहे व त्यास प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी मान्यता दिली आहे. अद्ययावत तंत्रज्ञान व आधुनिक अध्यापन पद्धती यावर आधारित हा सरकारी शाळेतील देशातील पहिलाच प्रकल्प असणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील २१ व्या शतकातील कौशल्ये, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, युनेस्को यांच्याकडून २०३० पूर्वी शाश्वत शैक्षणिक विकासाची उद्दिष्टे तसेच FLN, NAS, PISA च्या इंटिग्रेशन साठी या नाविन्यपूर्ण उपक्रमाची मोलाची मदत होणार आहे. याची उपयुक्तता जाणत कोल्हापूरसह, औरंगाबाद, अहमदनगर सातारा या जिल्ह्यात या उपक्रमाच्या धरतीवर अंमलबजावणी विविध शाळांमध्ये सुरू झाली आहे. या प्रकल्पासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे(TRTI) यांच्यावतीने लोणावळा येथे 3 व 4 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या दोन दिवसीय 121 आदर्श आश्रमशाळांच्या मोड्युल निर्मिती कार्यशाळेसाठी श्री रविंद्र केदार यांना तज्ज्ञ सुलभक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर व ग्लोबल क्लासरूम या विषयांतर्गत ‘स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम’ मध्ये राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. हे सादरीकरण राज्यभरातून आलेल्या शिक्षक, अधीक्षक, तज्ज्ञ सुलभक, SCERT व TRTI Pune च्या तज्ज्ञांच्या समोर झाले. सर्व मान्यवरांनी वर्गात राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.
राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या सादरीकरणासाठी संधी मिळणे म्हणजे आत्तापर्यंत अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत करवीर नगरीमध्ये विद्या मंदिर यादववाडी शाळेत निष्ठेने केलेल्या कार्याची पोहच पावती आहे असे वाटते. प्रथम दिनी उद्घाटन प्रसंगी TRTI चे आयुक्त व बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ. राजेंद्र भारुड सरांनी संवेदनशील व सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी आदर्श मोड्युल तयार व्हावे ही इच्छा व्यक्त केली. शिक्षणाच्या पंढरीचे विठ्ठलरूपी व्यक्तिमत्त्व मा. दत्तात्रय वारे सरांचे विचार व त्यांचा सहवास व श्री रविंद्र केदार यांचे नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण ही उपस्थित सर्वांसाठी एक पर्वणीच होती. आदर्श शाळा घडवायची असेल तर विद्यार्थी हा केंद्रघटक मानून शिक्षणव्यवस्थेत शिक्षक, मुख्याध्यापक, अधीक्षक इ. वरिष्ठ व कनिष्ठ पदाच्या भिंती पाडणे गरजेचे आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. आदरणीय वारे सरांनी मांडलेले विचार सर्वांसाठी एकप्रकारचा ‘बौद्धिक फराळच’ होता. SCERT Pune चे इंग्रजी भाषा प्रमुख डॉ. अरुण सांगोलकर सर तर साक्षात ज्ञानसूर्यच आहेत. त्यांचे या मोड्युल निर्मितीत सर्वांनाच मौल्यवान मार्गदर्शन लाभले.
या दोन दिवसीय या कार्यशाळेत सहायक आयुक्त अमरावती मा. श्री. संजय ससाणे सर, मा. TRTI चे प्रशासकीय अधिकारी शामकांत दौंडकर व दशरथ पानमंद सर, डायट बुलढाणा चे अधिव्याख्याता मा. श्री. अरविंद शिंगाडे सर यांनी अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केले. सर्व प्रशिक्षणार्थी अतिशय उत्साही व हरहुन्नरी आहेत. सर्वांनी रात्री बारा वाजेपर्यंत मोड्युल निर्मितीसाठी सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षणाचे उत्तम संयोजन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. राजेश सुर्वे सर व सचिन पायके सर व टीमने अतिशय नेटके नियोजन केले. TRTI च्या सर्व टीम चा उत्साह हा ओसंडून वाहत होता. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी सुलभक मार्गदर्शक यांच्यासाठी सोयीसाठी लोणावळा येथे थ्री-स्टार रिसोर्ट मध्ये सर्वांच्या विचारमंथनामधून व सहकार्यातून आवश्यक भौतिक सुविधा, अद्ययावत तंत्रज्ञान व आधुनिक अध्यापन पद्धतीवर आधारित एक आदर्श मोड्युल लवकरच तयार होत आहे. कार्यशाळेसाठी TRTI टीम चे उत्तम सहकार्य लाभले.










