व्रतस्थ समाजशिक्षिका -उषा तळप मॅडम
व्रतस्थ समाजशिक्षिका- मा.उषा तळप मॅडम
कोल्हापूर/ मारुती फाळके
आचार विचारांच अद्वैत फार कमी माणसांना जमतं, ते जमण्यासाठी विचारांची स्पष्टता आणि बांधिलकीच भान असणं आवश्यक असतं,आणि बांधिलकी सामाजिक अभिसरणातून अंगी बानवली जाते, आणि यातूनच समाजनिर्मितीची,संस्काराची प्रक्रिया सुरू होते, हे संस्कारमूल्य रुजवण्यामध्ये आई वडिलांच्या नंतर नैतिक जबाबदारी स्वीकारणारा घटक येतो तो म्हणजे शिक्षक. जीवनाला सार्थकता प्राप्त होते ती शिक्षकांच्यामुळे!
मग कवी बा.भ. बोरकरांच्या काव्यपंक्ती या ठिकाणी सार्थ ठरतात
“जीवन त्यांना कळले हो!
मी पुन्हा ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो!
जीवन त्यांना कळले हो!
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चरा चरांचे होऊनि जीवन स्नेहासम पाजळले हो!
जीवन त्यांना कळले हो!!
मग अशा व्यक्ती समाजापुढे आदर्श ठरतात आणि या आदर्शांच्या विचारांच्या पाऊलवाटेवर समाज आपला मार्गक्रमण करत असतो. समाजाच्या दिशां समृद्ध होण्यात हेच विचार कामी येतात. म्हणूनच समाजाची एकूणच जडणघडण होण्यामध्ये ‘शिक्षक’ हा अत्यंत मूलभूत घटक मानला जातो. शिक्षकी पैशाचा हा संस्कार आणि संस्कृती चा वसा आणि वारसा ज्यांनी सेवेच्या शेवटच्या क्षणापर्यंत इमानेइतबारे सांभाळला अशा व्रतस्थ समाजशिक्षिका,केंद्रीय प्राथमिक शाळेच्या पदवीधर अध्यापिका मा.उषा तळप पाटील मॅडम या नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त होत आहेत,यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
संवेदनशील मन,सतत विद्यार्थी शाळा,समाज यांच्याबद्दल चिंतनशील असणाऱ्या तळप मॅडम., प्राथमिक शिक्षक असणाऱ्या वडिलांच्या संस्काराच्या मुशीत घडल्या. त्यांच्यावर विद्यार्थी दशेतच शिक्षक होण्याचे संस्कार बिंबले आणि हे व्रत त्यांनी निष्ठेने पूर्ण केले. मूळ गाव चनवाड व सासरचे ठिकाण शाहूवाडी तालुक्यातीलच गोगवे.
पती राजाराम महाविद्यालय कोल्हापूर येथे रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक.
तळप मॅडम यांनी १९८६ साली शिरगाव या गावातून ज्ञानादानाच्या सेवेचा आरंभ केला.सुरवातीचा काळ शिराळे तर्फ मलकापूर,कोळगाव या शाहूवाडी तालुक्यातील गावात नोकरी केल्यानंतर पुढची सेवा उजळाईवाडी व नंतर पदवीधर शिक्षिका म्हणून पदोन्नती झाल्यानंतर मजले,शिरोली न.१, (हातकणंगले) व २०१९ ते २०२२ या काळात अखेरची सेवा गडमुडशिंगी केंद्रशाळेत बजावली.
प्रदीर्घ ३६ वर्षाच्या सेवेत विद्यार्थ्यांशी नाळ मात्र कायम ठेवली.,अनेक विद्यार्थ्यांना मायेचा आधार देत कधी अनाथ मुलांची माय तर,गोरगरीब मुलांच्या आधारवड झाल्या.,परंतु सहवासात आलेल्या प्रत्येकाला त्या आपल्याच वाटायच्या,आणि त्या ही वय विसरून निखळ हास्य साकारत सर्वांच्या लोकप्रिय कधी झाल्या ,हे उलगडून पहावे हे एक कोडेच आहे. समोरची व्यक्ती भेटता क्षणी निखळ हास्य आणि आस्थेवाईकपणे केलेली विचारपूस हे सहवासात आलेला प्रत्येक जण कधीच विसरणार नाही.
सेवेच्या संस्मरणीय प्रवासात अनेक क्षण असे आहेत की त्यांचे मन सुखावून आणि समाधुन जाते.,समाधान,निरामयता,सफलता हे त्यांच्या चेहऱ्याकडे बघितले की आपसुकच उमगते.प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना दिलेली ज्ञानाची शिदोरी हीच जन्मोजन्मी ची पुण्याई आहे असे त्या मानतात.ज्या समाजामध्ये शिक्षण व्यवस्था सक्षम- सदृढ आहे तिथे नीती मूल्यांचीबांधणी सक्षमपणे होते.,यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.
आजवर त्यांचे शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा परिक्षात,शालेय क्रिडा,सांस्कृतिक स्पर्धेत अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत,तालुकास्तर विज्ञान प्रदर्शन, शिक्षक साहित्य निर्मिती, इंग्रजी अनुधावन अशा विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.त्यांचे अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, सैन्य दल अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.म्हणून आजही त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या पायाशी नतमस्तक होतात,आणि म्हणतात, मॅडम,तुम्हीच गिरवलीत आमच्या आयुष्याच्या फळ्यावर संस्काराची अक्षरं!
तळप मॅडम यांच्या आणखी एका अंगभूत गुणांवर प्रकाश टाकावा तो म्हणजे त्या संवेदनशील मनाच्या कवी,साहित्यिक आहेत. समाजमनाचे निरीक्षण आणि अनुभव घेत असताना आजवर त्यांनी विविध विषयांवर काव्यलेखन केले आहे. सजगता,मार्मिक मांडणी व नेमकेपणा हे त्यांच्या काव्यशैलीचे विशेष गुण आहेत.
सेवाकालात त्यांना अनेक नामवंत संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांचे आजवर प्रकाशित लेख व कविता .
१) हिरकणी प्रातिनिधिक काव्यसंग्रहामध्ये ” मला जगायचंयं ” कविता प्रकाशित,
२) कोरोना प्रातिनिधिक काव्यसंग्रहामध्ये “त्रिदेव “कविता प्रकाशित
३) अष्टपैलू काव्यमंच मार्फत काव्यसंग्रहामध्ये ” ज्ञान आम्हा दयावे देवा ” ही प्रार्थना प्रकाशित .
४) जीवन शिक्षण मासिकामध्ये ” माझा वाढदिवस लेख प्रकाशित
५) राजर्षी शाहू अभियान हातकणंगले तालुका पुस्तकामध्ये लेख प्रकाशित आहेत.
तळप मॅडम यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यास “आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे,जाता जाता पायामधले बळ तेवढे वाढवीत जावे,पायामधल्या वाटा सुद्धा हळूहळू बदलत जातात,जाता जाता आपले ठसे मागे ठेवून जातात” या ओळींचा प्रत्यय येतो.
अंतःकरणात माणुसकीचा ओलावा,इतरांप्रति सदभावना, नम्र,विनयशील,प्रेमळ,अजातशत्रु,व्यासंगी,तत्पर असणाऱ्या उषा तळप मॅडम यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त सुंदर सदिच्छा- कार्यक्रम होत आहे.,
मॅडम म्हणजे आजपर्यंत सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या आईसाहेबच! अशा माणुसकीच्या गुणांनी ओतप्रोत भारलेल्या तळप मॅडम यांना उर्वरित आयुष्य सुख,समाधान,निरामय,आरोग्यपूर्ण जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!










