भेडसगाव ग्रामपंचायतीच्या सतेच्या चाव्या हंबीरराव पाटील गटाकडेच
भेडसगाव ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या हंबीरराव पाटील गटाकडेच, सत्ताधारी गटाला लोकनियुक्तसह ६,तर विरोधी गटाची ६ जा मुसंडी
भेडसगाव/ मारुती फाळके
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भेडसगाव ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या अपेक्षेप्रमाणे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले. या गटाच्या सौ. तेजस्विनी सुभाष पाटील यांनी विरोधी आनंद ग्रामविकास पॅनलच्या डॉ. मीरा उदय पाटील यांचा ५२ मतांनी पराभव करत लोकनियुक्त सरपंच पदाला गवसणी घातली.अत्यन्त अटीतटीने झालेल्या या निवडणुकीत हंबीरराव पाटील गटाने सरपंच पदासह ६ जागा तर विरोधी आनंद ग्रामविकास पॅनेलने मुसंडी मारत तब्बल ६ जागांवर सदस्य उमेदवार विजयी केले. या निवडणुकीत गावाने अखेरच्या क्षणापर्यंत हुरहूर व घालमेल अनुभवली.ही निवडणूक देखील शिवसेनेचे हंबीरराव पाटील व युवा नेते विजय पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यातच झाली. गोकुळचे दिवंगत संचालक आनंदराव पाटील(तात्या) यांच्या स्नुषा डॉ.मीरा उदय पाटील यांच्या सरपंच पदाच्या उमेदवारीने चांगलीच रंगत भरली होती. एकूण ३०९९ मतदानापैकी २७८८ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.
गेली महिनाभर स्थानिक मतदार,मुंबईचे चाकरमानी,परगावस्थित मतदार यांच्या गाठीभेटीने तसेच कोपरा सभा,आरोप प्रत्यारोपाने वातावरण चांगलेच ढवळून निघाले. सत्ताधारी भेडसगाव ग्रामविकास पॅनेलने केलेला विकास वचननामा ,पुस्तकरूपाने मतदारासमोर ठेवला;आणि विकासाला विरोध करणाऱ्यांनो तुमचे काय? असा सवाल उपस्थित करत समाजमन ढवळून काढले तर विरोधी आनंद ग्रामविकास पॅनेलने विकासातून राईचा पर्वत करू नका असा पलटवार केला.
सन २०१२ पर्यंत भेडसगावामध्ये कै.आनंदराव पाटील गटाची सत्ता होती.तात्यांचे निधन झाल्यानंतर गावात विकासकामाला खीळ बसली होती,हाच मुद्दा अजेंड्यावर घेऊन माजी सभापती हंबीरराव पाटील यांनी गाव पिंजून काढले आणि ११पैकी ८ जागांवर विजय मिळवत तात्यांच्या गटाच्या ४० वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला.विजय मिळाल्याच्या क्षणापासून हंबीरराव पाटील यांनी गावकऱ्यांना दिलेला शब्द प्रमाण मानून विकासकामांचा सपाटा लावला. पाटील यांनी भवानी तलावातील कित्येक वर्षांपासून चा गाळ काढून ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्णत्वास नेली. पुन्हा २०१७ साली हंबीरराव पाटील गटाने ११ पैकी ७ जागा व सुपुत्र अमरसिंह पाटील यांना लोकनियुक्त सरपंच करण्यात यश मिळवले. यावेळी हंबीरराव पाटील यांचे चिरंजीव अमरसिंह पाटील थोडक्या मतांनी विजयी झाले. अमर पाटील यांनी आपल्या कार्यकाळात चौफेर विकास साधला,या काळात शासनाचे गावाला स्मार्ट ग्राम,यशवंत सरपंच, यशवंत ग्रामपंचायत असे तब्बल ३ पुरस्कार लाभले’.
सन २०१७ सालात गावच्या विकासाचे स्वप्न साकारत कोट्यावधी रुपयांची विकास कामे खेचून आणत ग्रामविकास साधला. ग्रामदैवत नीलकंठेश्वर मंदिर ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ समावेश, भवानी तलावाची प्रदूषण मुक्ती, गावामध्ये सुधारित नळ पाणी पुरवठा योजना, ग्रामसचिवालय नूतनीकरण अंतर्गत रस्ते गटर्स,प्राथमिक शाळा,आरोग्यवर्धिनी केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना,दलित वस्ती सुधारणा, गावामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे,कचरा गाडी,शुद्ध पाणी,दळप कांडप केंद्र, 15 टक्के मागासवर्गीय निधी वाटप, वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना घराघरांमध्ये पोहोचवण्यात ते सरस ठरलेत. या विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी निवडणूक लढवली,परंतु मतदारांनी या निवडणुकीत विकासाकामाचा विचार न करता भावकी,क्रॉस मतदान करून आपापले हित संबंधातील उमेदवार निवडून आणले. या निवडणुकीत गोकुळचे दिवंगत संचालक आनंदराव पाटील यांच्या स्नुषा डॉ. मीरा उदय पाटील यांनी मोक्याच्या क्षणी एन्ट्री करत चांगलीच लढत दिली. अवघ्या ५२ मतांनी हंबीरराव पाटील गटाच्या तेजस्विनी सुभाष पाटील यांनी त्यांचा पराभव करत विजयश्री खेचत सरपंचपद काबीज केले. अपेक्षेप्रमाणे हंबीरराव पाटील यांना ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळाले असले तरी गत निवडणूकित मिळालेल्या यशापेक्षा २ सदस्य संख्येनी संख्याबळ घटले आहे.हा निकाल त्यांच्या गटास आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे. या निवडणुकीला भावकी अंतर्गत मनभेदाची किनार लागल्याचे दिसून आले.गटातटाच्या राजकारणापेक्षा भावकी,वैयक्तिक संबंधाचा प्रभाव दिसून आला.
प्रभाग १ मध्ये हंबीरराव पाटील गटाच्या बालेकिल्लाला सुरुंग लावत येथे तब्बल पाटील गटाच्या दोन उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रभाग १ मध्ये अनपेक्षितरित्या मधुकर बापू तांबे,भानुदास सर्जेराव लगारे यांनी विजयश्री खेचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये पराभूत उमेदवार आनंदा फाळके व रमेश लगारे यांना क्रॉस व्होटींग चा फटका बसला. तर या प्रभागात हंबीरराव पाटील गटाच्या प्राथमिक शिक्षक सुनील नलगे यांच्या पत्नी मनीषा सुनील नलगे यांनी विरोधी अनिता शेळके यांचा ६० मतांनी पराभव केला.
प्रभाग २ मध्ये लक्षवेधी लढत झाली. हंबीरराव पाटील गटाच्या माजी उपसरपंच सुनील उर्फ दाजी बाबुराव पाटील यांचा युवा नेते विजय पाटील यांचे चिरंजीव रणवीर पाटील यांनी ४२ मतांनी पराभव केला.हा धक्कादायक निकाल होता. तर या प्रभागामध्ये हंबीरराव पाटील गटाच्या शुभांगी साळुंखे या अवघ्या तीन मतांनी विजयी झाल्या. त्यांची सुवर्णा पाटील यांनी चांगलीच दमछाक केली.या प्रभागात रुपाली नरेंद्र गायकवाड यांनी दीपाली धर्मेंद्र कारंडे यांचा २५ मतांनी पराभव केला.
प्रभाग ३ या हंबीरराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात परंपरे प्रमाणे युवा उमेदवार पवनकुमार गोरख पाटील यांनी पंडित शामराव पाटील यांचा तब्बल १७४ मतांनी पराभव केला तर दुसऱ्या अनुसूचित जाती स्त्री उमेदवार लक्ष्मी सुधाकर कांबळे यांनी प्रफुल्लता शेखर प्रभावळे यांचा १६२ मतांनी पराभव केला.
प्रभाग क्र. ४ या कै.आनंदराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अपेक्षेप्रमाणे संजय बापू चौगुले यांनी तब्बल १७१ मतांनी शरद धोंडीराम पाटील यांचा पराभव केला, तर दुसऱ्या सर्वसाधारण स्त्री उमेदवार रेश्मा मानसिंग घाडगे यांनी १३३ मतांनी नंदा बाबासो चौगुले यांचा पराभव केला. दुसऱ्या स्त्री उमेदवार नीलम सुहास पाटील यांनी उषा बाळासाहेब पाटील यांचा ११२ मतांनी पराभव केला.
हंबीरराव पाटील गटाचे नेतृत्व माजी सभापती हंबीरराव पाटील यांच्या नियोजनाखाली माजी सरपंच बाळासाहेब पाटील,उद्योगपती आप्पासो साळुंखे,बाबुराव पाटील,माजी सरपंच अमरसिंह पाटील,डॉ.सुभाष पाटील,विक्रम हारुगडे,सर्जेराव पाटील,आनंदराव पाटील,बाबासो पाटील,आबा लगारे,संजू सरकार आदींनी तर विरोधी आनंद ग्रामविकास पॅनेलची धुरा सर्जेराव पाटील,विजय पाटील,उदय पाटील,मानसिंग घाटगे,मानसिंग लगारे,भोला कारंडे,अमर पाटील,जयदीप पाटील,आदींनी सांभाळली.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
लोकनियुक्त सरपंच
सौ.तेजस्विनी सुभाष पाटील -१३९८
विजयी उमेदवार
प्रभाग क्र. १
१.भानुदास सर्जेराव लगारे – ४१३
२.मधुकर बापू तांबे ४०२
३.सौ.मनीषा सुनील नलगे ४२७
प्रभाग क्र. २
१. शुभांगी महेश साळुंखे- ३३०
२.रुपाली नरेंद्र गायकवाड- ३४१
३.रणवीर विजय पाटील- ३५२
प्रभाग क्र. ३
१.पवनकुमार गोरख पाटील- ३४३
२.लक्ष्मी सुधाकर कांबळे-३३५
प्रभाग ४
१.संजय बापूसो चौगुले- ४७१
२.रेश्मा मानसिंग घाटगे- ४६६
३.नीलम सुहास पाटील- ४३९
पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते
प्रभाग १
१.रमेश आनंदा लगारे- ३८४
२.आनंदा खंडू फाळके – ३९४
३.अनिता बाबासो शेळके-३६७
प्रभाग २
१.सुवर्णा दत्तात्रय पाटील- ३२७
२.दीपाली धर्मेंद्र कारंडे-३१६
३.सुनील बाबुराव पाटील-३१०
प्रभाग ३
१.पंडित शामराव पाटील-१६९
२.प्रफुल्लता शेखर प्रभावळे-१७३
प्रभाग ४
१.शरद धोंडीराम पाटील- ३००
२.नंदा बाबासो चौगुले-३३३
३.उषा बाळासो पाटील-३०७
पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते
प्रभाग १
१.रमेश आनंदा लगारे- ३८४
२.आनंदा खंडू फाळके – ३९४
३.अनिता बाबासो शेळके-३६७
प्रभाग २
१.सुवर्णा दत्तात्रय पाटील- ३२७
२.दीपाली धर्मेंद्र कारंडे-३१६
३.सुनील बाबुराव पाटील-३१०
प्रभाग ३
१.पंडित शामराव पाटील-१६९
२.प्रफुल्लता शेखर प्रभावळे-१७३
प्रभाग ४
१.शरद धोंडीराम पाटील- ३००
२.नंदा बाबासो चौगुले-३३३
३.उषा बाळासो पाटील-३०७










