March 26, 2026

वाढीव ४४ गावे समाविष्टतेला मंजुरी,राजाराम ची सभा गाजली.

0
IMG-20230929-WA0056

वाढीव ४४ गावे समाविष्टतेला मंजुरी,राजाराम ची सभा गाजली.

मशिनरी, आधूनिकीकरण,सहवीज प्रकल्प अशा १४९ कोटी खर्चाच्या सुधारित बजेट साठी मान्यता, विरोधकांची समांतर सभा

कोल्हापूर/मारुती फाळके :

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मोकार्यक्षेत्रात नवीन ४४ गावे समाविष्ट करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. त्यासंबंधीच्या पोटनियम दुरुस्तीच्या ठरावाला सभासदांनी मान्यता दिली. तसेच कारखान्याचे मशिनरी, आधुनिकीकरण व सहवीज प्रकल्प उभारणीसाठी १४९ कोटीच्या सुधारित खर्चाच्या अहवाल प्रस्तावाला सभेत मान्यता मिळाली. जवळपास पाऊण तास ही सभा झाली. कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक अध्यक्षस्थानी होते.

 

कारखाना कार्यक्षेत्रातील वाढीव गावांच्या समाविष्टतेला मान्यतेसह सभेपुढील सर्व विषयांना मंजुरी मिळवत सत्ताधारी महाडिक आघाडीने विरोधी आघाडीला मात दिली. या सभेसाठी सत्ताधारी महाडिक आघाडीने शक्तिप्रदर्शन करत सभा यशस्वीतेसाठी केलेली रणनिती विरोधकांना भारी पडली.
दरम्यान विरोधकांनी सभा संपल्यानंतर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर विरोधी आघाडीने समांतर सभा घेतली. सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाला विरोध दर्शविला. तसेच कारखाना कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट वाढीव गावांच्या प्रस्तावाची होळी केली. आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नाहीत असेही विरोधी आघाडीचे सर्जेराव माने, मोहन सालपे, संदीप नेजदार यांनी म्हटले आहे. दरम्यान श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी झाली. सभेसमोर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्रातील नवीन ४४ गावे समावेश करण्याचा ठराव पोटदुरुस्तीसह मान्यतेसाठी ठेवला होता. यावरून विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील गटाने विरोध केला होता. पोटनियम दुरुस्तीवरून आरोप प्रत्यारोप, पत्रकबाजी झाले होते. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सभेकडे साऱ्यांच्या नजरा लागला होत्या.

 

सभेची वेळ सकाळी अकराची होती. त्या अगोदरच सभासदांनी सभास्थळ भरून गेले होते. सत्ताधारी आघाडीचे समर्थक सभासद हे हातामध्ये मंजूर मंजूर अशा आशयाचे फलक घेऊन व्यासपीठासमोर बसले होते. सभा सुरू होण्यास दहा मिनिटाचा अवधी असताना संचालक व माजी आमदार महादेवराव महाडिक व कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांचे संचालकांसह व्यासपीठावर आगमन झाले. महाडिक यांचे व्यासपीठावर आगमन होताच , सभासदांनी “महाडिक महाडिक धुमधडाका” अशा घोषणा दिल्या. कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. याप्रसंगी सभासदांनी मंजूर मंजूर अशा घोषणा दिल्या.कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी कारखान्याचा कारभार हा सभासदाभिमुख आहे. कारखाना शहरालगत असल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील गावांचे वाढते नागरिकीकरण होत आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे ऊस लागवडीचे व शेतीचे प्रमाण कमी होत आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करून व ऊस उत्पादन वाढीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील नवीन गावे समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय कारखान्याचा हिताचा असताना विरोधक विरोधाचे धोरण का अंगीकारत आहेत ? सहवीज प्रकल्पाला विरोध करण्याचे कारण काय ? असा सवाल त्यांनी केला.

 

सभेमध्ये अमल महाडिक यांनी साखरेला प्रति क्विंटल ३६०० रुपये हमीभाव मिळावा. ऊस पिकाला विमा संरक्षण द्यावे अशी मागणी सरकारकडे केली. या मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. साखर आयुक्त पुणे यांच्याकडून कारखान्याच्या 18.5 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी, मशिनरी आधुनिकीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. सुधारित खर्चाचा १४९ कोटी ९० लाख ७१ हजार रुपयांच्या अहवाल आहे‌. हा सुधारित अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. वार्षिक सभेच्या निमित्ताने सभासदांनी विचारलेल्या सव्वीस प्रश्नांना उत्तरे दिली असल्याचेही सांगण्यात आले.

 

सत्ताधाऱ्यांचे शक्ती प्रदर्शन… लक्षवेधी फलक
राजाराम कारखानाच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने सत्ताधारी महाडिक आघाडीने शक्ती प्रदर्शन घडवले. माजी आमदार महादेवराव महाडिक, चेअरमन अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या छायाचित्रांचे फलक हाती घेऊन सभासदांनी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला. कारखाना परिसरात विरोधकांच्या भूमिकेचा समाचार घेणारे फलक लावण्यात आले होते. ” गगनबावडा कारखान्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभासद असतात मग राजाराम कारखाना कार्यक्षेत्रातील वाढीव गावांना विरोध का ? जे कारखान्यात ऊस घालत नाहीत त्यांनी संचालक पदासाठी निवडणूक लढवू नये जो संचालक व्हायचे स्वप्न बघतो त्याने आधी स्वतः ऊस घालावा. एखाद्या घराचं बांधकाम काढायचं म्हटलं तरी आपण कर्ज घेतो कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि विस्तारीकरणासाठी कर्ज घेतले तर बिघडले कुठे ? एकीकडे प्रगती का केली नाही म्हणून विचारायचा आणि दुसरीकडे आधुनिकीकरण व सहवीज प्रकल्पाला विरोध करायचा ? अशी दुटप्पी भूमिका कधीपर्यंत सहन करायची ? तुमच्या कारभाराचे आधी सांगा मग आमच्यावर बोला” असे फलक लक्ष वेधून घेत होते.
कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील यांनी आभार मानले.

 

सभेला व्हाईस चेअरमन नारायण चव्हाण, दिलीप पाटील, दिलीप मारुती केडगावकर, तानाजी पाटील – गडमुडशिंगीकर, सर्जेराव भंडारे विलास जाधव, गोविंदा चौगुले, संजय मगदूम विजय भोसले, विश्वास बिडकर,शिवाजी पाटील, सर्जेराव पाटील संतोष पाटील, कल्पना पाटील वैष्णवी नाईक मीनाक्षी पाटील, सुरेश तानगे, नंदकुमार भोपळे, निमगोंडा पाटील, अनिल साजनकर, नामदेव पाटील, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, माजी नगरसेवक सत्यजित कदम, सचिव उदय मोरे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!