पंतप्रधान मोदी चंद्रावर घरे बांधून देण्याचे आश्वासन देतील -ज्योती ठाकरे
पंतप्रधान मोदी चंद्रावर घरे बांधून देण्याचे आश्वासन देतील !
शिवसेना पक्षनेत्या ज्योती ठाकरे यांची घणाघाती टीका ;
शाहूवाडी तालुक्यात शिवसेनेचे ‘होऊ दे चर्चा’ अभियान
जुमलेबाज सरकारचा भांडाफोड करण्याचे शिवसैनिकांना आवाहन
फसव्या सरकार मुळे लोकशाही धोक्यात– अमरसिंह पाटील- भेडसगावकर.
भेडसगाव/ मारुती फाळके
चांद्रयान मोहीम यशस्वी झाली याचा देशवासियांना निश्चितच अभिमान आहे. मात्र, पंतप्रधान याचे भांडवल करून येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रावर घरे बांधून देण्याचे आश्वासन देऊन जनतेला पुन्हा एकदा भुलविणार आहे. अशी घणाघाती टीका शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या ज्योती ठाकरे यांनी केली. भाजप आणि शिंदे गटाला ‘गये गुजरे..’ असे संबोधून चौकाचौकात जनतेत जाऊन या जुमलेबाज सरकारचा भांडाफोड करा, असे आवाहनही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.
शिवसेना ठाकरे पक्षाचे ‘होऊ दे चर्चा’ हे अभियान राज्यभरात सुरू आहे. या अभियानाच्या अनुषंगाने पक्षनेत्या ज्योती ठाकरे यांनी शाहूवाडी सरुड, भेडसगांव, निनाई परळे येथील कार्यक्रमात सरकारच्या योजना कशा फसव्या आहेत याची पोलखोल केली.
प्रारंभी छ. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसेना सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महाराष्ट्राचा आवाज वाढला तरच दिल्लीचा आवाज नरमतो, अशी भाषणाची सुरुवात याचसाठी होऊ दे चर्चा अभियान हाती घेतल्याचे सांगत उपनेत्या ज्योती ठाकरे म्हणाल्या, ‘गरज सरो वैद्य मरो’ ही हीन प्रवृत्ती जोपासणाऱ्या भाजपने शिवसेनेच्या पाठीत प्रत्येक वेळी खिंजिर खुपसला, नेतृत्वाला प्रचंड मानसिक त्रास दिला. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर पहाटेचा शपथविधी करणाऱ्यांनी हुंदुत्वाच्या गप्पा मारू नयेत. शिवसेनेचे हिंदुत्व भेदभाव करीत नाही. शेंडी जानव्याचं हिंदुत्व नव्हे तर हाताला काम देणारे हिंदुत्व पुढे घेऊन जाण्याचा वसा आणि वारसा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जपला आहे. भाजप म्हणजे ‘भामटा जगलाचं पाहिजे’ अशी उपहासात्मक आणि जळजळीत टीकाही त्यांनी केली.
प्रत्येक ठिकाणी माझ्याच नावाचा डंका झाला पाहिजे, असा अट्टाहास करणारा पहिलाच दुराभिमानी पंतप्रधान देशाला लाभला. जनधन योजनेच्या निमित्ताने खोललेल्या बँक खात्यातील जनतेचा पैसा खुशकीच्या मार्गाने लूटला. स्किल इंडिया द्वारे किती बेरोजगारांना प्रशिक्षण मिळाले ? प्रशिक्षणच मिळालेच नाही तर सरकार नोकरी व्यवसाय कुठून देणार? अशी सरकारच्या योजनांची फसवी बाजू जनतेसमोर ठेवली. राज्यातील शिंदे सरकारचा घटनाबाह्य सरकार असा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवसेने बरोबर सत्तेत असताना उपमुख्यमंत्री पद असंवैधनिक आहे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्याच पदाच्या खुर्चीवर बसवून नियतीने सूड उगवला.
यावेळी ठाकरे गटाचे युवासेना उपजिल्हाप्रमुख अमरसिंह पाटील- भेडसगावकर म्हणाले, आजची युवा पिढी वैफल्यग्रस्त होत आहे. हाताला काम नाही, उद्योग नाही, रोजगार नाही, नोकरी नाही, ज्या पण काही शासकीय नोकरभरती निघाल्या त्या सगळ्या पेपर फुटीच्या नावाखाली न्यायप्रविष्ट आहेत. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा नाहीत, परीक्षांच्या नावाखाली भरमसाट फी गोळा केली जात आहेत,परंतु प्रत्यक्षात परीक्षाच होत नाहीत.,सरकारने वेळ काढूपणाचे धोरण अवलंबले आहे, या सरकारवर तरुणांसह सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे उद्याची शाश्वत पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे, त्यासाठी तरुणांनी वेळीच सावध होऊन केंद्र व राज्यातील हे फसवे सरकार हद्दपार करण्यासाठी निकराची भूमिका उचलावी. सर्वसामान्य माणसासह इथे लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे,संविधान धोक्यात आणले जात आहे. प्रत्येक क्षेत्रात कंत्राटीकरन, खाजगीकरणाचा डाव घातला आहे. सरकारी शाळा बंद करण्याचा कुटील डाव सरकार योजत आहे, आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे, एकूणच या सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, हे सिद्ध होते. यासाठी केंद्र आणि राज्यातील हुकूमशाही भाजप सरकार हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन अमरसिंह पाटील यांनी केले.
जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी म्हणाले,राज्यात शिवसेना पक्षाला बहुतेक ठिकाणी दगाफटका झाला मात्र शाहूवाडी तालुक्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नसल्याचा अभिमान व्यक्त केला. गरीब, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देताना केलेल्या सामाजिक कार्याचा आढावाही यावेळी सादर केला.
वक्ते राजेंद्र चौगुले (कोल्हापूर), तालुका प्रमुख दत्तात्रय पवार, युवती सेना तालुकाप्रमुख पूनम भोसले, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदूम, जालिंदर पाटील-रेठरेकर, पांडुरंग केसरे, आप्पासाहेब साळुंखे,डॉ.सुभाष पाटील,योगेश हारूगडे, संपत कोकाटे,सरपंच तेजस्विनी पाटील, उपसरपंच हर्षदा साळुंखे, तसेच स्थानिक भागातून आलेले विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.










