कृष्णात खोत यांचा बुधवारी
कोल्हापुरात ‘दमसा’ च्या वतीने नागरी सत्कार समारंभ
कोल्हापूर/मारुती फाळके
‘रिंगाण’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोल्हापूरचे सुपुत्र ख्यातनाम लेखक कृष्णात खोत यांचा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने येत्या बुधवारी (ता.२४) नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शाहू स्मारक भवनाच्या मिनी सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता समारंभ होईल.
नुकताच कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी वि. स. खांडेकर, रणजित देसाई, गो. मा. पवार, विश्वास पाटील, राजन गवस, किरण गुरव आदी लेखकांचा या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला आहे. निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील रहिवाशी असलेल्या खोत यांनी या लेखकांच्या पंगतीत स्थान मिळवले आहे. त्याबद्दल दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार होणार आहे.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक आणि हैद्राबाद येथील इंग्लिश अँन्ड फाँरिन लँग्वेजेस युनिव्हर्सिटीच्या माजी प्र-कुलगुरू डॉ. माया पंडित असतील. डॉ. माया पंडित यांनी ‘रिंगाण’ कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पन्हाळा-शाहुवाडीचे आमदार, माजी मंत्री विनय कोरे (सावकार), गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी.पाटील उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून कादंबरीकार नामदेव माळी तसेच कवी आणि पत्रकार डॉ. विजय चोरमारे मांडणी करणार आहेत . हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन, दसरा चौक,कोल्हापूर येथे बुधवार दि.२४ रोजी सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू आणि कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.










