डॉ.चंद्रकुमार नलगेंना तिळगंगाचा सन्मान
डॉ. चंद्रकुमार नलगेंना तिळगंगाचा सन्मान
इस्लामपूर/प्रतिनिधी
इस्लामपूर येथील तिळगंगा साहित्यरंग परिवारकडून तिळगंगा ज्येष्ठ साहित्यिक कृतज्ञता सन्मानसाठी उजळाईवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या नावाची घोषणा झाली आहे.नलगे यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने साहित्यातील सन्मानाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मान झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, अध्यक्ष मेहबूब जमादार यांनी माहिती दिली.
रविवारी (ता. २) राम मंदिर (पेठ) येथे होणाऱ्या ८ व्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. नलगे यांनी साहित्य चळवळ आणि नव्या शिकत्या व लिहित्या हातांना बळ दिले. ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केली, तसेच दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना केली.
कथा, कादंबरी, कविता, ललित गद्य, प्रवासवर्णन, बालसाहित्य, संशोधनात्मक चरित्रात्मक लेखन या साहित्याच्या विविध प्रांगणात नलगे यांनी चौफेर लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यावर पन्नासहून अधिक जणांनी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली. त्यांची शंभरहून पुस्तके प्रकाशित झाली आहेत.










