चौथी थी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
चौथी थी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने निर्णय
कोल्हापूर/मारुती फाळके :
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे. विभागामार्फत अभ्यास करण्यात येऊन तसेच तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येऊन हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल आणि ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असून शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. या परिस्थितीचा विचार करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ किंवा नऊ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पुर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत या सूचना निर्गमित करण्यात आल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.










