मिलेट महोत्सवाला प्रारंभ..नाचणीची गोबी..ज्वारीची इडली..बाजरीच्या लह्या..सावा, राळ,कोद्रा चा पुलाव
मिलेट महोत्सवाला प्रारंभ..नाचणीची गोबी..ज्वारीची इडली..बाजरीच्या लह्या..सावा, राळ,कोद्रा चा पुलाव
कोल्हापूर टाइम्स 24 प्रतिनिधी
कोल्हापूर/मारुती फाळके :
कोल्हापुरात पहिल्यांदाच भरविण्यात आलेल्या मिलेट महोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. या महोत्सवात एकूण ४५ स्टॉल आहेत. महोत्सवात विक्रीसाठी अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा असे विविध तृणधान्ये उपलब्ध आहेत. तसेच ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविण्यपूर्ण अशी असंख्य प्रकारची उत्पादने थेट उत्पादकांकडून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांचे विभागीय कार्यालय कोल्हापूर व नाबार्ड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘मिलेट महोत्सव २०२४’ चे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले.
कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव आदी उपस्थित होते. ताराराणी विद्यापीठ परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे महोत्सव भरविले आहे. २४ ते २७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत महोत्सव खुले आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘भरडधान्य हे शरीराला पौष्टिक असून ते पारंपरिक पद्धतीने शेतकरी पिकवतो, खातो. नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या भरडधान्याचा फायदा सगळयांना होतो. सध्या सर्वांची आहारपद्धती बदललेली आहे. त्याच अनुषंगाने भरडधान्यचे महत्व सर्वांना कळावे म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. अशा या पारंपरिक, नैसर्गिक आणि आरोग्यासाठी लाभदायक भरडधान्याचा वापर सर्व वयोगटासाठी महत्त्वपूर्ण आहे.’
उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले म्हणाले,‘मिलेटच्या जनजागृतीसाठी महोत्सव भरविले आहे. याठिकाणी महाराष्ट्र राज्यासह छत्तीसगड, गोवा येथून स्टॉलधारक सहभागी झाले आहेत, याचा फायदा कोल्हापूरकरांनी घ्यावा.’ जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव यांनी आभार मानले. महोत्सवात मिलेट उत्पादन, मुल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्य विषयक महत्व या विषयी मार्गदर्शनपर व्याख्याने, मिलेट आधारित महिलांसाठी पाककृति स्पर्धा, खरेदीदार-विक्रेते संमेलन असे कार्यक्रम आहेत.
—————————————————–कोल्हापूर च्या कृषी महाविद्यालयाची सोलकढी अन आंबील…!
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू कृषी महाविद्यालयाने नाचणीची सोलकढी, ज्वारीचं आंबील,तृणधाण्यापासून बनवलेले गुलाबजाम हा स्टॉल ला खवय्यांचा प्रतिसाद लाभत आहे.मैदाविरहीत पदार्थातून शरीराला पोषकता व सकसता मिळण्यासाठी कृषी महाविद्यालयाचा स्टॉल लक्ष वेधून घेत आहे.










