आता सुट्टी न्हाय,क्रीडांगण होणारच!,टेंबलाईवाडी, विक्रमनगर, विकास मंचच्या वतीने लोकवर्गणीतून साकारतेय भव्य क्रीडांगण
आता सुट्टी न्हाय!क्रीडांगण होणारच!
टेंबलाईवाडी, विक्रमनगर, विकास मंचच्या वतीने लोकवर्गणीतून साकारतेय भव्य क्रीडांगण
हजारो ज्येष्ठ व युवकांनी उचललाय विडा
लोकसहभागातून होणार साडेपाच एकर जागेचा कायापालट!
समाजातील सर्व स्तरातून हवेत मदतीचे हात
कोल्हापूर/मारुती फाळके
ऐतिहासिक त्र्यंबोली देवीच्या पायथ्याला टेंबलाईवाडी,विक्रमनगर येथे हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत,नागरिकीकरणाच्या वेगाने शहरीकरण झपाट्याने झाले,काही पायाभूत सुविधा झाल्या,पण मोकळा श्वास घेण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी मैदान नव्हते पण आता गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे गावाने एकदा मनात घेतले की काय बदल होऊ शकतो याचा ग्राउंड रिपोर्ट म्हणजे लोकसहभागातून टेंबलाईवाडी, विक्रमनगर परिसरात क्रीडांगण साकारत आहे. राजकिय व प्रशासकीय नाकर्तेपणाला न जुमानता इथले हजारो युवक एकत्र येऊन सुसज्ज क्रीडांगण निर्माण करण्यासाठी सरसावले आहेत आणि अवघ्या १० दिवसात ही लोकचळवळ यशस्वी झाली आहे.
कोल्हापूर महानगर पालिकेच्या हद्दीतील साडेपाच एकर जमीन पडीक जमिनीवर टेंबलाईवाडी, विक्रमनगर, विकास मंच आणि भागातील सर्व ५८ सार्वजनिक तरुण मंडळे, ज्येष्ठ नागरिक, क्रिंडा प्रेमी, फुटबॉल प्रेमी, युवक युवतीं मंडळच्या कार्यकर्त्याच्या लोकसहभाग, लोकवर्गणीतून फोंड्या माळरानावर भव्य असे क्रीडांगण साकारत आहे. येथील क्रीडांगण साठी दिवस रात्र एक हजार युवकांचे हात राबत आहेत. या क्रीडांगणावर फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, हॉलीबॉल खेळण्यासाठी युवक, युवती, शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना खेळाचे मैदान उपलब्ध होणार असल्याने या भागात ३३ वर्षानंतर या जागेला खेळाचे स्थान प्राप्त होणार आहे.
एकिकडे या ठिकाणी आय आर बी ची साडे चार एकर जागा आहे. येथे आय आर बी ची बिल्डिंग पडीक आहे. या इमारतीला लागूनच साडे पाच एकर जमिनीचे क्षेत्र कोल्हापूर महानगर पालिकेच्या हद्दीतील आहे. आय टी पार्क, टिंबर मार्केट ऊभे करण्याची नुसतीच हवा होती. पण या भागातील लोकांनी आपल्या भागातील जमीन जाऊ न देण्यासाठी स्थानिकांनी शड्डू ठोकला आणि गेल्या पंधरा दिवसांपासून युवकांची फौज, त्यास ज्येष्ठ नागरिकांची साथ मिळाल्याने येथे क्रिंडगण आकाराला येत आहे .
आता पर्यंत दहा दिवसात पन्नास हजार वर्गणी गोळा झाली आहे. सर्वच स्तरातील लोकांकडून मदतीचे हात जोडले जातील. लोकप्रतिनिधींनीही यासाठी एकीचे बळ दाखवून होणाऱ्या क्रीडांगण साठी प्रशासनाच्या मदतीने सहकार्य करावे. गेले अनेक वर्षे येथील युवक युवती क्रीडा प्रेमी या जागेवर क्रीडांगण व्हावे म्हणून धडपडत आहेत. त्याच्या सप्नाची पूर्तता होत असल्याने मोठ्या क्रीडांगणावर खेळाचे सर्व प्रकार खेळले जाणार आहेत. डी वाय पाटील ट्रस्ट कडून जेसीबी दिला आहे. नागरणी साठी रोटा व्होट्रर कार्यरत आहे. हे काम सर्व लोकवर्गणीतून होत आहे.
नावालाच आय आर बी..आणि ऐकत आलो आश्वासने…
….कोल्हापूरात रस्ते विकासाच्या नावाखाली आय आर बी कंपनी आली,रस्ते विकास झाला,पण टेंबलाईवाडी, विक्रमनगर च्या स्थानिकांच्या सार्वजनिक जमिनी हडपुन इथे फाईव्ह स्टार हॉटेल साठी इमारत सुरवात झाली,लोकांना गाजर दाखवले पण मुळात काम पूर्णत्वास गेले नाही,परिसरात असणारी कित्येक एकर जमीन पडीक झाली.आज ना उद्या या जागेवर काहीतरी होईल ही केवळ इथल्या नागरिकांसाठी आशाच राहिली.पण कित्येक वर्षे लोटली पण इथे काहीच झाले नाही.,गेल्या कित्येक वर्षांपासून इथे क्रीडांगण व्हावे यासाठी खुली चर्चा,प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी झाली परंतु पुढे काही झाले नाही,अखेर जनमाणसातून उठाव होऊन क्रीडांगणा चे लक्ख स्वप्न आज सत्यात उतरत आहे हे केवळ संघटित समुहामुळे!
चौकट:१
सर्वांच्या सहकार्यातून क्रीडांगण साकारत असल्याचा आनंद- सागर पाटील फुटबॉल खेळाडू
——इथे ३३ वर्ष झाले जमीन पडुन होती. माळरान होते. काळ वाट जमिनीत आता सर्वांच्या सहकार्यातून क्रीडांगण साकारत असल्याचे आनंद होत आहे.व्हाट्सअप ग्रुप तयार करून जमा निधी, खर्च होत असलेला निधी व शिल्लक याचा लगेच हिशोब ग्रुप वर येत असल्याने लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे,यासाठी दानशूर व्यक्ती,सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, शाळा,विद्यार्थी यांचे सहकार्य घेतले जात आहे.
सागर पाटील, फुटबॉल खेळाडू
चौकट:२
सुसज्ज क्रीडांगण साकारल्याशिवाय थांबणार नाही-योगेश अजाटे(सामाजिक कार्यकर्ते)——-
टेंबलाईवाडी, विक्रमनगर परिसरात लाखोंच्या संख्येने वस्ती आहे,मुलांना खेळण्यासाठी इतरत्र जावे लागत होते,परिसरात हक्काची जागा असूनही क्रीडांगनासाठी कोणतीही कृती होत नव्हती, युवकांच्या व ज्येष्ठाच्या मार्गदर्शनातून विचार पुढे आला.आणि कामास सुरवात झाली आता याच जागेवर कोल्हापुरातील आदर्श क्रीडांगण साकारण्यासाठी सर्वजण हातात हात घालून राजकारणविरहीत काम करणार आहे.
चौकट:३
या जागेवरील आरक्षण हटवून तातडीने इथे क्रीडांगण होण्यासाठी भागातील सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. या जागेवर फक्त क्रीडांगण होण्यासाठी पाठबळ द्यावे
—–संतोष भोसले, ज्येष्ठ नागरिक
चौकट:४
या भागात कुठेच क्रीडांगण नाही. याचा उपयोग आता येथील नऊ शाळा मधील विद्यार्थ्यांच्या शारिरीक व्यायामासाठी होणार आहे.
——सर्जेराव कांबळे,रहिवासी
चौकट ५.-
येथील एक हजार युवकांचा व्हॉट्स ॲप ग्रुप आहे. एका संदेशात सर्व युवक एकवटले जात आहेत. ही क्रीडांगण होण्यासाठीची तळमळ आहे. आणि लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.
–अस्लम नदाफ, खेळाडू
चौकट ६-
विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याचा विकास होण्यास मदत – राजेंद्र पाटील
सहाय्यक शिक्षक
भाई माधवरावजी बागल हायस्कूल टेंबलाईवाडी
परिसरात अद्ययावत क्रीडांगणाची गरज होती,ध्येयवेड्या नागरिक व युवकांच्या लोकचळवळीतून क्रीडांगण निर्माण होत आहे याचा एक शिक्षक म्हणून आनंद आहे,या प्रभागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याचा विकास होण्यासाठी क्रीडांगणा चे स्वप्न पूर्ण होत आहे. या क्रीडांगणाचा फायदा परिसरातील शाळांना होईल.
चौकट ७.
*ज्येष्ठांचे मार्गदर्शन…आणि युवकांची धडपड… अल्पावधीत जन्म घेतेय सुसज्ज क्रीडांगण*—–
परिसरात अनेक शाळा आहेत.विद्यार्थ्यांच्या तील कारक कौशल्ये व सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी खेळ, व्यायाम आवश्यक आहे, परंतु परिसरात विस्तृत असे क्रीडांगण नव्हते,
टेंबलाईवाडी, विक्रमनगर, विकास मंचच्या वतीने लोकर्गणीतून साकारत असलेल्या क्रीडागंणाचा मुलांसाठी निश्चित फायदा होईल व यातून भविष्यात अनेक नामवंत खेळाडू घडतील याबाबत तिळमात्र शंका नाही.
— मारुती फाळके- पत्रकार.
चौकट-८.
पायाभूत गरजेची निर्मिती होत आहे.-
राजेंद्र कोरे
मुख्याध्यापक सिद्धेश्वर विद्यालय विक्रमनगर
—-टेंबलाईवाडी व विक्रमनगर परीसरात चांगल्या क्रीडांगणाची गरज होती ती लोकसहभागातून पूर्णत्वास येत आहे,शालेय विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होईल.
(फोटो ओळ:टेंबलाईवाडी, विक्रमनगर, विकास मंचच्या वतीने भव्य क्रीडांगण आकाराला येत आहे.त्याचे सपाटी करण सुरू आहे.)










