शाहू महाराज व सत्यजित पाटील यांच्या विजयाचा वज्रनिर्धार!
शाहू महाराज व सत्यजित पाटील यांच्या विजयाचा वज्रनिर्धार
कोल्हापुरात शिवसेनेचा ‘निष्ठावंत मेळावा’ संपन्न
कोल्हापूर/मारुती फाळके
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघावर भगवा फडकवून निवडून आणलेले दोन्ही खासदार बेईमान निघाले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देऊन कोल्हापूरच्या गादीचा सन्मान केला आहे. तसेच निष्ठावंत शिवसैनिक शाहुवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या शिवसैनिकाला लोकसभेचे तिकीट देऊन जनमानसातला उमेदवार दिला आहे. शाहू महाराज व सत्यजित पाटील यांच्या हातात शिवसेनेची मशाल देऊन तुतारी फुंकत संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संसदेत पाठविण्याचा वज्रनिर्धार करत शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या समर्थनार्थ दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ‘निष्ठावंत मेळावा’ संपन्न झाला. यावेळी शाहू महाराज छत्रपती यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा वज्रनिर्धार शिवसैनिकांनी केला.
अरुण दुधवडकर म्हणाले, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाने एकमताने उमेदवारी देऊन कोल्हापूरच्या गादीचा सन्मान केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांना भेटून त्यांच्या विजयाचा शब्द दिला. त्यामुळे गावागावात महाराजांचा प्रचार करण्यासाठी शिवसैनिक अग्रभागी राहतील. नवनीत राणा आणि कंगना राणावत यांना भाजपने उमेदवारी
दिल्यामुळे त्यांचा खरा चेहरा स्पष्ट झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली, त्याच रागापोटी भाजपने केवळ मुंबई लुटण्यासाठी गुजरातींनाच उमेदवारी दिली. मात्र, मुंबईतील शिवसैनिक मोदी आणि शहा यांना मुंबई लुटू देणार नाहीत, असे दुधवडकर यांनी सांगितले.
श्रीमंत शाहू महाराजांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. हे शिवसेनाप्रमुखांचे संस्कार आहेत, तर दुसरीकडे मिंधे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा भाजप कार्यालयात झालेला अपमान पाहता मंडलिक आणि धैर्यशील माने यांची अवस्था ‘कोण होतास तू…’ अशी झाली आहे. जिकडे जाईल तिकडे त्यांचा बेन्टेक्स म्हणून अपमान होत आहे,’ असा टोला उपनेते, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी लगावला.
हातकणंगलेसाठी उमेदवारी जाहीर झालेले माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, अस्लम सय्यद, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संजय चौगुले, सुरेश साळोखे, संजय घाटगे, उल्हास पाटील, सुजित मिनचेकर उपस्थित होते.
————————–
आता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही – शाहू महाराज
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध गेल्या दहा-बारा दशकांपासून आजही कायम असल्याचे सांगत, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी १९९८ मध्ये शिवसेनाप्रमुखांनी आपल्या उमेदवारीसाठी केलेल्या प्रयत्नाची आठवण करत कृतज्ञता व्यक्त केली, ते म्हणाले, ‘सध्या दिल्लीचे राजकारण पाहता लोकशाही की हुकूमशाही अशी चिन्हे दिसत आहेत. इंडिया आघाडी नक्कीच संविधानाचे रक्षण करेल. तसेच मोदी व बीजेपी जास्त पुढे जाऊ नयेत, यासाठी जनता नक्कीच विचार करेल. त्यामुळे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा विश्वासही श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केला.
———————
महाविकास आघाडीतील घटक पक्षाची वज्रमुठ आणि विजयाची खात्री- सत्यजित पाटील- सरुडकर
गेल्या ३ महिन्यापासून महाविकास आघाडीत सहभागी घटक पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राहुल गांधी, शरद पवार, यांच्याबद्दल समाजात चांगले वातावरण आहे.,जयंत पाटील,मानसिंगराव नाईक,शिवाजीराव नाईक,उल्हास पाटील, सुजित मिनचेकर या आणि इतर सर्व नेत्यांची आपापल्या मतदारसंघात ताकद आहे,महाविकास आघाडीचे गठ्ठा मतदान माझ्या विजयाचा मार्ग सुकर करेल!सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी माझ्या निष्ठेचा सन्मान केला आहे. त्याबद्दल मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत राहणार!










