ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार-
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती
२६ जूनला वितरण!
कोल्हापूर /मारुती फाळके
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा मानाचा ३८ वा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना जाहीर झाला आहे. मानचिन्ह, मानपत्र व एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. राजर्षी शाहू जयंती दिनाचे औचित्य साधून २६ जून २०२४ रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी व ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी दिली. ट्रस्टतर्फे १९८४ पासून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
दरम्यान ट्रस्टतर्फे शाहू जयंतीचे औचित्य साधून २१ ते २५ जून २०२४ या कालावधीत व्याख्यानमाला आयोजित केली आहे. शाहू स्मारक भवन येथे व्याख्यानमाला आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. व्याख्यानमालेतंर्गत २१ जून रोजी लोकमतचे संपादक वसंत भोसले यांचे भारतातील संसदीय लोकशाही या विषयावर व्याख्यान आहे. २२ जून रोजी डॉ शिवाजी पाटील (सातारा ) यांचे भारतातील न्यायव्यवस्था या विषयी व्याख्यान आहे. २३ जून रोजी सातारा येथील किशोर बेडकीहाळ यांचे भारतीय राष्ट्रवाद-वाटा आणि वळणे या विषयी तर २४ जून रोजी मुंबई येथील डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांचे भारताचे परराष्ट्र धोरण या विषयी व्याख्यान आहे.
२५ जून रोजी, निवृत्त जिल्हाधिकारी व साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचे राजर्षी शाहू महाराज व भारताचे संविधान या विषयी व्याख्यान आहे. व्याख्यानमाला रोज सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. जिल्हा प्रशासन, राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. पत्रकार परिषदेला डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.










