March 24, 2026

कलाशिक्षक सागर बगाडे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

0
IMG-20240827-WA0043

कलाशिक्षक सागर बगाडे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर,

शिक्षकदिनी नवी दिल्लीत वितरण

कोल्हापूर/मारुती फाळके

कोल्हापुरातील सौ. स. म. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील कलाशिक्षक सागर चित्तरंजन बगाडे यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४’ जाहीर झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी या पुरस्काराची घोषणा केली आहे.रोख ५० हजार रुपये, रौप्यपदक व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

बगाडे हे कलासक्त व्यक्तिमत्त्व असून जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि जीवनाच्या प्रत्येक आव्हानावर मात करत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आजवरचे जीवन व्यतीत केले आहे. त्यांचे आजवरचे शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक कार्य याचा विचार करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शून्यातून सुरुवात करत शिक्षक, कलाशिक्षक, नृत्यदिग्दर्शक ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा प्रवास थक्क करणारा आहे अशा शब्दांत अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
दरम्यान पाच सप्टेंबर २०२४ रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यासंबंधीची माहिती या विभागाचे सहसचिव अनु जैन यांनी दिली आहे. देशभरातील ५० शिक्षकांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील दोघा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.यामध्ये कोल्हापूरचे सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे. सागर बगाडे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन, त्यांच्याशी समरस होऊन अध्यापन करणारे शिक्षक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. कलाशिक्षक ही बगाडे यांची ओळख. शिक्षकी पेशासोबतच त्यांना विविध विषयात रुची आहे. ते कलासक्त मनाचे व्यक्तिमत्व आहे. नृत्यदिग्दर्शक आहेत. अभिनायची आवड आहे. राज्य नाट्य स्पर्धा गाजविल्या आहेत. लेखनाची गोडी आहे. शालेय मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करतात.
स.म.लोहिया हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करताना विविध कलासंस्थेत ते सक्रिय आहेत. सामाजिक संस्थेशी निगडीत आहेत. दि न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी स.म. लोहिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ऐतिहासिक प्रसंगावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण,विविध सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे योगदान असते. सार्थक क्रिएशन्स या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.त्यांचे आजवरचे सामाजिक व व्यक्तिगत पातळीवरचे कार्य देखील सामाजिक बांधिलकी जोपासणारे आहे.
आजवरच्या त्यांच्या एकूण कार्याची दखल घेवून या पुरस्कारासाठी पात्र ठरले.


समाजासाठी समर्पन भावनेने केलेल्या कार्याचे फळ

      शिक्षक किंवा एक कलाकार म्हणून आजवरचे कार्य करीत असताना नेहमीच समाजाला देत आलो.कधीच कोणत्या फळाची अपेक्षा बाळगली नाही. समाजासाठी निरपेक्ष भावनेने कार्य केल्याची पोचपावती या राष्ट्रीय पुरस्काराने मिळाली. या सन्मानाने भविष्यात काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. हा पुरस्कार मला उभं करणाऱ्या समस्तासाठी मी समर्पित करतो.

—- सागर बगाडे,कलाशिक्षक स.म.लोहिया हायस्कूल कोल्हापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!