March 24, 2026

कष्टाचं संचित अन माणुसकीचा जिवंत झरा-सखाराम फाळके

0
IMG-20240902-WA0061

कष्टाचं संचित अन माणुसकीचा जिवंत झरा- सखाराम फाळके

भेडसगाव/मारुती फाळके

आचार विचारांच अद्वैत फार कमी माणसांना जमतं आणि ते जमण्यासाठी विचाराची स्पष्टता आणि बांधिलकीचं भान असणं आवश्यक असतं. कवी बा.भ. बोरकरांच्या काव्यपंक्तीत सांगायचं म्हटलं तर
“जीवन त्यांना कळले हो|
मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो|
गेले तेथे मिळले हो|
चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो|
जीवन त्यांना कळले हो||
अशा संस्कार मुल्यांच्या चौकटीत,समर्पण भावनेने अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिलेले व्यक्तिमत्व सखाराम फाळके पंचक्रोशीतील सर्वांचा तात्या.
जीवनाची उभी हयातभर कष्ट, संघर्ष आणि आलेल्या परिस्थितीवर स्वार होत संसार उभा केला. नाचार दुबळ्या प्रपंचातून गाठीला गाठ जोडत संसार फुलवला. सतत काबाडकष्ट उपसत दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करून जीवनाची दिशा दाखवली. घरादाराच बस्तान बसवलं. सख्या- चुलत भावंडात अशा विस्तृत गोतावळ्यात अनेकांच्या सुखदुःखांची देवाणघेवाण करत ते प्रत्येकाचे सोबती झाले,संसारवेल फुलवली,मुलग्याला पोलीस घडवलं,मूलगीला नर्स केलं.कुटुंब उभा केलं असे वारणा कापशी ता.शाहूवाडी येथील कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार गोरक्ष फाळके यांचे वडील सखाराम बंडू फाळके(वय ६९) यांचे निधन झाले.सखाराम तात्या म्हणजे मांगल्याचं संचित अन माणुसकीचा निखळ झरा.

जीवनात आलेल्या प्रत्येक प्रसंगाला सामर्थ्याने आणि तितक्याचे चिकाटीने सामोरे जात पै ला पै जोडत संसाराचा गाडा ओढत त्यांनी यशस्वी संसारवेलीची गाथा अजरामर केली. सहवासात आलेल्या प्रत्येकाला मायेची ऊब आणि जिव्हाळ्याचा आधार देत जन्मोजन्मीचं संचित सुख, आपुलकी,प्रेम, माया, ममता या सदगुणांचा आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत वर्षाव केला.कापशी येथील ग्रामपंचायत चे सेवानिवृत्त झाडू कामगार सखाराम तात्या यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर, पंचक्रोशीवर आणि पर्यायाने नातलगांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

त्यांचं आयुष्य म्हणजे समर्पणच होते. जे कष्ट वर्णन करण्यासारखे शब्द नाहीत अशी कामे केली.प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत गावगाड्यात राबत राहिले, नको ते कष्ट उपसले,गावाची इमान इतबारे सेवा केलं. संसाराच्या असंख्य कठीण प्रसंगात ते छातीची ढाल करून कायम ठामपणे उभे राहिले.
५ सख्खे भाऊ १ बहीण,पाचही भावाचे हातावरची पोटं. पण चांगुलपणा व इमानपणा कधी सोडला नाही.मूळचे भेडसगावचे पण कापशी गावाला गावकी करण्यासाठी ‘मांग’ नव्हता म्हणून गावकी करण्यासाठी त्यांचे पूर्वज कापशी गावात आले आणि ते कापशीतच स्थायिक झाले.गावगाड्यात कष्ट करणं पसंत केलं.घराच्या आणि संसाराची जबाबदारी अनुभव नसण्याच्या वयात खांद्यावर येऊन पडली. अनेक जबाबदाऱ्या पेलत तिने चंद्रमोळी घरातून आपल्या संसारात भरभराट आणि समाधान निर्माण केले.
मुलांच्यावर नेहमीच संस्काराची, विचारांची आणि आदर्श गुणांच्या चांगुलपणाची पखरण केली. मुलांना शिक्षणाची गोडी लावली. दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. एका मुलीला सुखाच्या घरी देऊन संसाराची आनंदवेल सुखी समृद्ध केली.
त्यांच्या सततच्या कृतीशील जीवनरहाटीमुळे असंख्य माणसं जोडली. माणसांच्या गोतावळ्यात राहण्याच्या वर्धिष्णू भूमिकेमुळे त्यांचा लोकसंग्रह उत्तरोत्तर वाढतच गेला. तात्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श मानदंड निर्माण झाला.
जीवनात आलेल्या अनेक क्षमाशील अनुभवामुळे जीवनाचे खरे मर्म त्यांना कधीच उमगले होते.भवताल अनुभवल्यामुळे उत्तम संवादकौशल्य,स्मित हास्य,नम्रता आणि भावुकपणा या गुणांमुळे लोकांशी ‘या ह्रदयीचे त्या हृदयी’ जोडले जाणं हा त्यांचा स्थायीभावच.

गावगाड्यात पडेल ते काम करत गावातील अनेकांच्या सुखदुःखांचे सोबती, कधीकधी अनेकांच्या संकटांचा, प्रसंगाचा वाटाड्या म्हणून उभे राहीले.याचेच संचित म्हणून मुलगा गोरक्ष अत्यंत हलाखीत पोलीस भरती झाला आणि तात्याच्या कुटुंबाचा पांग फिटला. कुटुंबाची गाडी योग्य दिशेला आकार घेऊ लागली,मुलगीच्या संसाराचे चांगले झाले,आज मुलगा कोल्हापूर पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत आहे तर सून अंजना फाळके मोहोळ तेथे सहाय्यक पोलिस निरीक्षक आहे.

गावगाड्यात राबत असताना नेहमीच गावाच्या सेवेला तात्या हजर,गावातील लेझीम मंडळात घुमक्याचा नाद ऐकू आला की आपसूक लोक सखाराम फाळके च घुमकं वाजवत असणार हे नक्की ओळखायचे.चावडीवर दिवाबत्ती धरणे,गावकी करणे हे त्यांचा जीवनक्रम.निस्पृह भावनेने गावसाठी राबत राहिले.

अनेकांच्या दुभंगलेल्या संसाराला जोडणारा सांधा बनून त्यानी नेहमीच सांधण्याची भूमिका बजावली.नातं टिकवण्याच्या आणि दृढ करण्याच्या संबंधात तात्या नेहमीच अग्रभागी राहिले.गेल्या काही वर्षांपासून अर्धांग वायूच्या आजारामुळे ते घरातच होते.पत्नी,मुलगा,सून,लेक यांनी सेवेत कुठेच कुचराई केली नाही.अंगाला डाग लागू दिला नाही.गेली कित्येक वर्षे तात्या अबोलच होते,जाताना ही अबोलच राहून त्यांनी जगाचा निरोप घेतला.
आपल्या विस्तृत कुटुंबात त्यांनी संस्कार-विचारांची रुजवणूक केली. त्या भक्कम पायावर आज संपूर्ण कुटुंबाची जीवनरहाट सुरू आहे.तात्यांनी घालून दिलेल्या संस्कारची मुळे इतकी घट्ट आहेत की संपूर्ण गोतावळाभर त्याचा विस्तार झालेला आहे. सहवासात आलेल्या प्रत्येकाला, नातलगांना आबालवृद्धापासून तरुणांईप्रत प्रत्येक घटकाला संस्कार, नीती, मूल्य,सचोटी, निष्ठा, प्रामाणिकपणा,अथक कष्ट, निर्व्याज,निर्भेळ आणि निर्झर प्रेम करण्याचा त्यांचा मांगल्याने भारलेला संस्कार हा इथुनपुढे निरंतर गोतावळाभर रुंजी घालेल यात तीळमात्र ही शंका नाही.

घर उभा करणारी कर्ता माणूस,अस्तित्वाचं संचित निर्माण करणारा एक आदर्श पती, आदर्श कर्मचारी, आदर्श बाप,, आदर्श सेवक,तोंड भरून बोलणारा आदर्श माणूस, समाजवत्सल, कुटुंबवत्सल तात्या आपल्यात नाही या जाणीवेने मन घायाळ होते, मनात कालवाकालव सुरू होते. विचारांचे, भावनांचे,अगतिकतेचे वादळ निर्माण होते,मन सैरभैर होते. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात, मनाच्या गाभाऱ्याला हिंदोळे बसतात,मन शरीर विषण्ण होते. क्षणभर सारच संपल्यासारखं वाटतं, जीवनाची उभी हयातभर धरतीच अंथरूण आणि आभाळाचं पांघरून करून ज्यांनी संसाराचा यशोवेल वाढवला, विस्तारला त्या बहरलेल्या संसारात आज सखाराम तात्या नाहीत ही भावनाच मनाला पटत नाही. कुणाची दृष्ट लागली म्हणून हे संचिताचे सोज्वळ रूप तात्या आज हयात नाही, पण जरी हा देह आज इहलोकी सजीव रूपाने जरी आपल्यात नसला तरी त्यांच्या विचार- संस्काराच्या, विचारगुणांनी भवतालाला सतत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत राहील. प्रत्येकाच्या मनावर त्यांच्या स्वभावाची रुंजी घालील, त्यांच्या अस्तित्वाचा घडोघडी साक्षात्कार होईल., आणि तात्या इथेच कुठेतरी आहेत, ते पुन्हा येतील असा साक्षात्कार एक दिवस नक्की होईल.
आज फाळके कुटुंबीयात पोकळी निर्माण झालीय हे मात्र निश्चित!,विधाता या सर्वांना सावरण्याचं बळ देवो!
काळीज पिळवटून टाकणाऱ्या या अनाहूत प्रसंगामुळे फाळके कुटुंबियांना उभे राहण्याची ऊर्जा आणि उर्मी विधाता देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!कष्टातून,त्यागातून संसारवेल फुलवणाऱ्या सखाराम तात्या यांच्या चिरंतन स्मृतीस विनम्र आदरांजली!

चौकट-१

सून नव्हे लेक-
सहाय्यक पोलिस निरीक्षक अंजना फाळके

पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असूनही सून अंजना फाळके यांनी सासरे सखाराम फाळके यांची खूप सेवा केली. गेली १६ वर्ष अर्धांग वायूने ग्रस्त असलेल्या सासरे सखाराम तात्या यांची सेवा करण्यात कुठेच त्या कमी पडल्या नाहीत.अंघोळ घालणे,कपडे धुणे,खाण्यापिण्याची व्यवस्था, औषधपाणी ही सर्व व्यवस्था अंजनाने कटाक्षाने ठेवली होती. सासऱ्याच्या कपड्याला कधी डाग लागू दिला नाही.
सून अंजना फाळके यांनी लेकीसारखी सेवा केली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीच कुरबुर केली नाही.सुनेच्या या प्रेमामुळे तात्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघाळायचे.सुनेचे हे समर्पण पाहून सासू,संबंध गोतावळा हे
भरून पावला. पोलीस दलात उच्चपदस्थ असणाऱ्या अंजना फाळके यांनी सासऱ्याची सेवा करून एक वेगळाच आदर्श समोर ठेवला आहे. नोकरीत रत्नागिरी,ठाणे आणि आता सोलापूर या ठिकाणी बदली झाली पण सोबत सासू सासरे यांना सोबत घेऊनच जाईल तिथे राहणे पसंत केले.पोलीस खात्यात अतिसंवेदनशील कर्तव्य बजावत असताना घरचे कर्तव्य पार पाडण्यात अंजना फाळके कुठेच कमी पडल्या नाहीत. सून नव्हे माझी लेक म्हणूनच तात्यांनी कित्येकदा भावनांना वाट मोकळी करून दिली.सासरे गेल्यानंतर लेकीसारखा हंबरडा फोडणारी सून अंजना फाळके यांच्या कुटुंबवत्सल आदर्श नारीचा आजच्या समाजासमोर हा आदर्श आहे.

चौकट-२

कै. सखाराम फाळके सेवाभावी ट्रस्ट च्या माध्यमातून लोकांची सेवा करणार—–

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वडिलांनी मला घडवले. गरिबीची जाण ठेवून आई वडिलांच्या विचार संस्काराप्रमाणे घडलो. आज माझ्या कुटुंबाची आनंदवेल बहरत असताना वडिलांच्या जाण्याने अपार दुःख होत आहे. त्यांच्या संस्कार मूल्यांचा आदर्श ठेवून ‘कै. सखाराम फाळके ट्रस्ट’ नावाचे सेवाभावी व्यासपीठ स्थापना करून भविष्यात समाज उपयोगी काम करणार आहे.त्यांच्या मार्गदर्शनानेच कोरोनाच्या काळात संपूर्ण गावाला जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.निराधार,गरीब, गरजूंना मदत करणे हा त्यांचा संस्कार आयुष्यभर जपणार.

गोरक्ष फाळके
पोलीस हवालदार
कोल्हापूर पोलीस.

——————————

शब्दांकन- मारुती फाळके भेडसगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!