March 24, 2026

बहुजनांचे आनंदतीर्थ- स्व. आनंदराव पाटील(तात्या) भेडसगावकर

0
IMG-20240912-WA0056

बहुजनांचे आनंदतीर्थ- स्व. आनंदराव पाटील(तात्या) भेडसगावकर

लोकतीर्थ.. लोकनेता…लोकसेवक
अखेरच्या श्वासापर्यंत जपले समाजाचे दायित्व अन सामाजिक बांधिलकी!

२१ वा स्मृतिदिन -विशेष लेख

भेडसगाव/मारुती फाळके

कोल्हापूरच्या दवाखान्यात गावातील एका गरीब कुटुंबातला सामान्य व्यक्ती आजारी असल्याचे आनंदराव पाटील (तात्या)ना समजले. क्षणाचाही विलंब न लावता तात्या आंब्यातून कोल्हापुरातील त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरला भेटून त्या रुग्णाच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचा जीव वाचवण्यासाठी काहीही करा,पैशाची काळजी करू नका.असा आधार देत दवाखान्याचे सर्व बिल भरून, त्याच्या व सोबत असणाऱ्यांच्या राहण्या खाण्याची सोय करून कोणताही गाजावाजा न करता तात्या घरी परतले. चार दिवसांनी त्या पेशंटला दवाखान्यातुन घरी आणले,पेशंट सुखरूप घरी आले. जीवदान मिळाले. अगदी मृत्यूशयेवर असणारा तो रुग्ण बरा होऊन घरी आला. जेमतेम परिस्थिती असणाऱ्या त्या रुग्णाने दवाखान्याचे बिल भागवण्यासाठी आपली शेती विकण्याचा निर्णय घेतला होता, पण तात्या नावाचा ‘देव माणूस’ प्रसंगाला उभा राहिला आणि पोटापुरती कसायला असणारी जमीन शाबूत राहिली.

      कमी शिक्षण,ज्याला स्वतःची सहीदेखील करता येत नाही, काहींना स्वतःचे पूर्ण नाव इंग्रजी मध्ये लिहिता येत नाही, गावातील आणि तालुक्यातील अशा कित्येकांना गोकुळ दूध संस्थेत नेऊन नोकरीस लावले. अनेकांच्या संसारात आनंदवन निर्माण झाले. समृद्धी आली, भरभराट झाली,त्याच्या कुटुंबातील पोरं शिकू लागली, कुटुंबं उभा राहिली. अनेकांच्या जीवनामध्ये आनंदाचा,सुख, समृद्धीचा नंदादीप तेवत राहिला.कित्येकांच्या शिक्षणाला मदत केली., कुणाचे वाटसरू झाले तर कुणाचे आधारवड. कित्येक मुलींच्या लग्नासाठी आर्थिक भार उचलला.

     गावातील डी.एड, बी.एड झालेल्या अनेकांना त्यावेळी गावात असणाऱ्या शैक्षणिक संस्थेने नोकरीसाठी नाकारले, म्हणून गावामध्ये मुलांच्या माध्यमिक शिक्षणाचीही सोय होईल आणि गावातल्या कित्येक शिकलेल्या डी.एड, बी.एड बेरोजगार युवकांना नोकरीची संधी मिळेल या उदात्त,निरपेक्ष भावनेने ‘तात्या’ नावाच्या अवलियाने गावात हायस्कूल काढले.अनेकांना नोकऱ्या लागल्या,गावातच हायस्कूल शिक्षणाची सोय झाली.या संस्थेतून शिक्षण घेत अनेक विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवले आहे,कोण अधिकारी, कोण डॉक्टर, इंजिनिअर तर कोण शिक्षक, राज्य शासनाच्या सेवेत आहेत.

      समाजातील वंचित, शोषित, पीडित, भटक्या जाती, विमुक्त समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत म्हणून गावांमध्ये राज्य शासनाच्या मंजुरीने आश्रमशाळेची स्थापना केली. कित्येकांना गावांमध्ये राहण्यासाठी दहा बाय दहाची खोली एवढाच आसरा होता. अशा कित्येक गरजूंना गायरानात शासनाचा आदेश झुगारून घरे,जनावरे बांधण्यासाठी जागा दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी आणि प्रशासनाची मंडळी ही जागा ताब्यात घेण्यासाठी आणि बांधलेली घरे पाडण्यासाठी शासनाचा फतवा घेऊन जेव्हा गावात आली तेव्हा ‘तात्या’ नावाच्या व्यक्तिमत्वाने प्रशासनाशी संवाद साधत या लोकांची गरज त्यांच्यासमोर प्रकर्षाने मांडली आणि प्रशासनही सकारात्मक झाले. गावातील कित्येकांना हक्काचा निवारा- आसरा मिळाला.
अनेक सर्वसामान्य,गरजू,पिचलेल्या लोकांसाठी मदतीचा हात देऊन हिमालयाच्या उंचीएवढे कर्तुत्व असणारे भेडसगावचे सुपुत्र, तालुक्यातील जनसामान्यांचे लोकनेते,लोकसेवक,लोकतीर्थ, सुखदुःख व्यक्त करण्याचा हक्काचं ठिकाण म्हणजे शाहूवाडी तालुक्याच्या धवलक्रांतीचे शिल्पकार, गोकुळचे दिवंगत संचालक कुटुंबत्सल,समाजवत्सल,वर्धिष्णू व्यक्तिमत्त्व,असंख्य बहुजनांचे आनंदतीर्थ स्व. आनंदराव बापूसो पाटील(तात्या)- भेडसगावकर यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…….

ज्येष्ठ साहित्यिक,संपादक उत्तम कांबळे आपले लेखनात लिहिताना म्हणतात की, माणूस जन्माला येतो हे त्या परिस्थितीचं अपत्य असते. कदाचित भेडसगावकरांच्या आणि पर्यायाने त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या जीवनात आनंदतीर्थ निर्माण करण्यासाठीच आनंदराव पाटील नावाचं संचित जन्माला आलेलं असावं.१ मे १९४० रोजी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आनंदराव पाटील (तात्या)यांचा जन्म झाला. घरची जेमतेम परिस्थिती असताना काबाडकष्ट करून, शेतीभातीतील काम करून त्यांनी स्वतःला घडवलं. प्राथमिक शिक्षण भेडसगावच्या प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण माणिकवाडी ता. वाळवा तर पदवीचे शिक्षण इस्लामपूर येथे पूर्ण केले.७ भाऊ,१ बहीण,मोठी भावकी,गाव,जोडलेला विशाल जनसागर असा समृद्ध परिवार आणि जोडलेला समृद्ध गोतावळा अशा ऋणानुबंधाच्या सहवासात तात्यांची जडणघडण झाली.लोक त्यांना ‘तात्या’ या टोपणनावाने ओळखत.

पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर आपल्या नोकरीची सुरुवात आंबा ता शाहूवाडी येथील आश्रमशाळेतून शिक्षक म्हणून सेवेचा आरंभ केला.ही नोकरी अर्धवट सोडून पुन्हा ते रेल्वे पोलीस म्हणून रुजू झाले. सामाजिक कार्याच्या संस्कारपिंडामुळे त्यांचे नोकरीत मन रमले नाही. आणि आपसूक ते राजकारणात आले.शेकाप पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या शाहूवाडी मतदारसंघात तत्कालीन त्यांचे सहकारी सदा पाटील (चरणकर), के. के. पाटील (तुरुकवाडी), दादासाहेब पाटील (रेठरेकर) या मित्रपरिवाराच्या साथीने शेकाप पक्षात काम केले. तालुक्यात शेकाप पक्षाची बांधणी करण्यामध्ये तात्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते.उत्तम संघटक,कार्यकर्ता, अमोघ वक्तृत्व असणारा हा युवक काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या सान्निध्यात आला. गायकवाड यांच्याशी सहवास आल्यामुळे त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. प्रचारप्रमुख,उत्तम नियोजक, सर्व निवडणुकांच्या जोडण्या लावणे असे कौशल्य सिद्ध करत ते काँग्रेसपक्षाच्या विचारधारेशी एकरूप झाले. आणि इथेच गायकवाड साहेबांचा विश्वास त्यांनी संपादन केला.

गायकवाड साहेबाच्या बरोबर २५ वर्षे त्यांनी सक्रियपणे राजकारण- समाजकारण केले.गायकवाड साहेबांच्या आशीर्वादामुळे त्यांची गोकुळ मध्ये एन्ट्री झाली. हीच त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण ठरला,यापासून त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. गावगाड्यातील माणसांचा कल ओळखून शेतीला पूरक व्यवसाय असणाऱ्या दुग्धोत्पादन व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. गावोगावी दुध संस्थांची निर्मिती केली.गोकुळ दूध संस्थेची संलग्न असणाऱ्या या संस्था गोकुळ परिवाराशी कायमपणे जोडल्या.तालुक्यात,जिल्ह्यात दूध संस्थांचे जाळे निर्माण केले.

गोकुळ मध्ये संचालक म्हणून कार्यरत असताना उखळू, कांडवण या  दुर्गम भागातून दूध संकलनास वेळ होतो.दूध वासात बाहेर काढले जाते, ही बाब जेव्हा तात्यांच्या लक्षात आली, तेव्हा गोकुळच्या नियम- अटी -शर्तीत ‘शीतकरण’ केंद्र बसत नसतानाही त्यांनी खास बाब म्हणून गोगवे दूध शीतकरण केंद्राची निर्मिती केली. आज या केंद्राचे संकलन सव्वा लाख लिटर च्या वरती आहे.अनेक युवकांना या ठिकाणी १ रुपया न घेता नोकऱ्या दिल्या. अनेकांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद निर्माण करण्यासाठी हा ‘आनंदवन’ नेहमीच राबत राहिला, कष्टत राहिला.

श्रावण महिना आला की गावातल्या आया बहिणींना तात्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. श्रावण महिन्यातल्या सोमवारी स्वतःचा खर्च घालून तात्या अनेक प्रेक्षणीय ठिकाणी, पर्यटनस्थळी गावातील महिलांची सहल घडवून आणायचे. सर्वसामान्य- शेतकरी कुटुंबातल्या महिलांच्या जीवनामध्ये सहल- फिरण्याचा आनंद कुठून मिळणार? म्हणून तात्यांनी ही भावना ओळखून अनेक माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचे आनंद आणि समाधान पाहिले,तात्या कृतार्थ झाले. गावातील तमाम माता- भगिनींच्या चेहऱ्यावचे संचित सुख व आशीर्वाद तात्यांनी जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत मिळवला.

गावात मागासवर्गीय समाजाला पाणवठ्यावर येण्यासाठी मज्जाव होता.’एक गाव एक पाणवठा’ होण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला.गावात मध्यभागी ग्रामसचिवालयाच्या उभारणीमध्ये तर त्यांचे खूप मोठे योगदान आहे.सहवासात आलेल्या कित्येकांना त्यांनी मदत केली हे त्यांच्याही कधी लक्षात राहिले नाही,आणि त्यांनीही त्याची कधी नोंदही ठेवली नाही.

सुरुवातीच्या काळामध्ये शेजारच्या शिराळा तालुक्यातील ‘विश्वास सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून त्यांनी काम केले. कारखाना उभारणीच्या काळामध्ये तात्यांनी दिलेले योगदान हे समस्त शेतकरी वर्गाला आणि तत्कालीन मंडळींना ज्ञात आहेच. कारखान्याच्या तत्कालीन कारभारी मंडळींना तात्या नावाचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कार्यामुळे अधिक सर्वज्ञात होते. ‘तात्या’ नावाचा भेडसगावचा क्रांतिकारी कार्यकर्ता तालुक्याची ‘शान’ होती.

तात्यांच्या  जीवनात आलेला एक बाका प्रसंग म्हणजे तात्या गोकुळचे संचालक असताना गोकुळ संचालकांना मिळणारी गाडी १५- १५ दिवस रोटेशन प्रमाणे संचालकांना मिळायची, अशा काळात स्वतः ती गाडी न वापरता, पर्यटनस्थळ धार्मिक स्थळे न फिरता, संचालकांना असणारी आपली स्वतःची गाडी दूध संस्थांच्या संचालकांना -सहकार्यांना देऊन त्यांना पर्यटनस्थळी फिरून यावे,म्हणून तात्यांनी गाडी व सर्व खर्च दिला.दुर्दैवाने तिरुपती ला जात असताना आंध्रप्रदेश राज्यातील ‘काडाप्पा’ या ठिकाणी गाडीला अपघात झाला. त्यांचे जवळचे गावातील काही सहकारी, विशेषकरून डोणोली ता.शाहूवाडी  गावातील काही जवळचे सहकारी यामध्ये मृत्युमुखी पडले.ही बातमी समजताच अगदी वाऱ्याच्या वेगाने तात्या त्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचले, आणि मृतदेह उचलण्यापासून ते त्या मृतदेहांना भडाग्नी देण्यापर्यंत सर्व कर्तव्य पार पाडले. त्यांच्या कुटुंबाला आधार दिला.त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील एकाला गोकुळमध्ये नोकरभरती करून त्यांच्या संसारात सुखाची दरवळ निर्माण केली.

गावामध्ये ,परिसरामध्ये- तालुक्यामध्ये संघटन बांधण्यामध्ये या अवलियाचे कसब निराळेच. गावातील प्राथमिक शिक्षक ,दुसऱ्या फळीतील नेतेमंडळी यांना एकत्रित करून “मर्द मराठा दख्खनच्या या ऐतिहासिक नाटकासाठी सर्वतोपरी मदत केली. कोल्हापूरहून रेफ्रि,स्टेज, साऊंड व इतर सर्व साहित्य पुरवले.या सर्व गोष्टी स्वतः पदरमोड करून पुरवल्या.या दिव्यत्वातून साकारले भेडसगावच्या कलाकारांची कलाकृती असलेले ऐतिहासिक नाटक “मर्द मराठा दख्खनचा” या नाटकाने अनेक प्रयोग केले.भागातील लोकांचे मनोरंजन केले.कलेला पाठबळ देणारा हा लोकप्रतिनिधी ‘विरळाच’!

भेडसगाव या आपल्या जन्मगावामध्ये ‘मदर पीएचसी’ असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यामध्ये तात्यांचे योगदान अमूल्य होते.त्यांच्या प्रयत्नाने गावात आरोग्य केंद्र सुरू झाले आणि शाहुवाडीच्या उत्तर भागातील लोकांची सोय झाली.’तात्या’ नेतृत्व करत असतानाच्या कारकिर्दीमध्ये गावातील शिवकालीन ‘भवानी’ तलावाचा गाळ काढण्याचा प्रयत्न झाला होता. आनंद माध्यमिक विद्यालय, आनंद प्राथमिक आश्रमशाळा, सेवा संस्था, दूध संस्था,तरुण मंडळे, नाटक मंडळ,तालीम स्थापनेमध्ये तात्यांनी नेहमीच पाठबळ दिले,पुढाकार घेतला.

कित्येक युवकांना, कित्येक निराधार कुटुंबांना,गोरगरिबांना, बहुजन समाजातील असंख्यजणांना आर्थिक रूपाने मदत केली.आज ‘तात्या’नावाचे वादळ जनमानसात नसले तरी किर्तीरूपाने ते नेहमी भेडसगावकरांच्या,तालुक्यातील, जिल्ह्यातील कित्येकांच्या हृदयामध्ये अढळ स्थानी आहेत. ‘तात्या’ नावाची जागा लोकांच्या मनातून एक यत्किंचितही पुसली जाणार नाही, हे त्रिकालाबाधित,युगानयुगे वास्तव सत्य आहे.तात्यांच्या विचारकार्याचा आदर्श घेऊन त्यांचे वारसदार युवा नेते विजय पाटील,उदय पाटील,अमर पाटील जयराज पाटील,मुलगी शुभांगी जाधव व स्नुषा डॉ. मीरा पाटील हे तात्यांचा राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा नेटाने पुढे चालवत आहेत.

खरं तर माणसं जन्माला येतात आणि एक वेळ या इहलोकातून निघून जातात. काही माणसं त्यांच्या अंगभूत गुण, कौशल्य, ख्याती, कीर्तीने जनमाणसांमध्ये कायम अजरामर राहतात., या संस्कार संचितातीलच वर्धिष्ण व्यक्तिमत्त्वाचे संचित म्हणून भेडसगावच्या आनंदराव पाटील- भेडगावकर यांच्याकडे पाहिले जाते.अगाध दातृत्व, नेतृत्व व कर्तृत्व असणाऱ्या,बहुजनांचा कैवार घेणाऱ्या ‘आनंदतीर्थ’ तात्यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

 

चौकट-१

अन्नदाता

तालुक्यात आणि जिल्ह्यात ‘अन्नदाता’ म्हणून भेडसगावच्या आनंदराव पाटील यांची ओळख होती.वर्षातून कित्येक वेळा ते तालुक्यातील, गावातील लोकांसाठी अन्नदान करायचे. अन्नदानात एक ईश्वरी आनंद मानण्याचा त्यांचा संस्कार होता.

चौकट-२

हजाराचे बक्षीस

हायस्कूल मधील एका कार्यक्रमाला उपस्थित असताना एका मागासवर्गीय समाजातील मुलाने ‘अण्णाभाऊ साठे’ यांच्या जीवनावर बहारदार भाषण केले. त्याच्या भाषणांने व पाठांतर कौशल्याने तात्या इतके मंत्रमुग्ध आणि प्रभावी झाले की त्यांनी खिशातील दोन हजार रुपये त्या विद्यार्थ्याला बक्षीस म्हणून दिले.मागासवर्गीय समाजातील मुलांनी शिकून प्रगती करावी अशी त्यांची नेहमी शिकवण असायची.

चौकट-३
‘गोकुळ’मध्ये ‘तात्या’ नावाच अस्तित्व!

जिल्ह्यातील प्रमुख आर्थिक सहकार संस्था असलेल्या ‘गोकुळ’ मध्ये फक्त ‘तात्या’ म्हटले की सगळी सूत्र हालायची असा एकेकाळी रिवाज होता. तालुक्यातील -जिल्ह्यातील कित्येकांना नोकरीसाठी, घरगुती प्रसंगात, मुलांच्या लग्नासाठी,विशेष मुलींच्या शिक्षणासाठी- लग्नासाठी प्रचंड मदत केली. पण त्यांनी त्याचा कुठेच गाजावाजा केला नाही. आज २१ वर्षानंतर सुद्धा तात्यांच्या दातृत्वाची जनमाणसात चर्चा असते.जिल्ह्यात आजही भेडसगाव हे गाव त्यांच्या नावामुळेच जिल्ह्याच्या पटलावर सर्वश्रुत झाले.आजही गावाचे नाव सांगितले की लोक तात्या च्या विषयी भरभरून बोलतात.

चौकट- ४

राजकारणात अपयश पण समाजकारणात मुसंडी!

तात्यांनी पंचायत समितीची निवडणूक दोन वेळा लढवली, परंतु या निवडणुकीत त्यांना अपयश आले. राजकारण आपल्याला लाभदायी नाही हे ओळखून त्यांनी आपला पिंड समाजकारणाकडे वळवला. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ- गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून अनेक गरजू, गरीब, वंचित, शोषित, पीडित, मागास कुटुंबातील युवकांना नोकरीची संधी देऊन त्यांचे संसार उभे केले.अनेकांची आसवं पुसली,अनेकांचे आधारवड झाले. गोकुळमध्ये त्यांच्या कारकीर्दीत तब्बल ६० वर युवकांना नोकरी देणारा हा जिल्ह्यातील एकमेव ‘गोकुळ दूध संघाचा लोकप्रतिनिधी’ म्हणून तात्यांच्या नेतृत्वाची झलक आजही जिल्ह्यात चर्चिली जाते.

चौकट- ५

दारात गेलेला माणूस कधीही न जेवता माघारी परतला नाही..
तात्यांच्या आंबा, कोल्हापूर या निवासस्थानी कोणत्याही कामासाठी गेलेला कोणताही ‘गरजू’ न जेवता कधीच माघारी आला नाही.भागातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील कोणीही कोणत्याही कामासाठी जाऊ दे, तात्या पहिली त्याची जेवलास का? आणि गाडीला पैसे आहेत का? या दोन बाबींची पहिल्या प्रथम चौकशी करत. एक एक वेळेस तरी कामासाठी,भेटण्यासाठी आलेल्या संख्येने कितीही असलेल्या सगळ्यांना घेऊन तात्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांच्यासोबत जेवण करायचे. त्यांना खाऊ पिऊ घालून त्यांच्या कामाचा निपटारा करून, गाडी खर्चाला पैसे देऊन गावाकडे पाठवत. कार्यकर्त्याची इतकी काळजी घेणारा,आजच्या राजकारण्याच्यात ‘निराळाच’,’विलक्षण माणुसकीने’ भारावलेला लोकप्रतिनिधी म्हणजे भेडसगावचे गोकुळचे दिवंगत संचालक स्व.आनंदराव पाटील म्हणजे सर्वांचे तात्या होते. आजही तात्या गेल्याच्या २० वर्षानंतर कार्यकर्त्यांचा ‘आत्मा तृप्त करणाऱ्या’ तात्यांच्या माणूसपणाच्या ओलाव्याची आपसुकच जनमानसाच्या डोळ्यात वेदनेच्या अश्रूंना वाट मोकळी करून ‘वर हाताच्या’तात्यांची प्रतिमा अधिक ठळकपणे चर्चिली जाते.आणि आपसूक तोंडातुन शब्द बाहेर पडतात असा ‘नेता’ होणे नाही.

 

चौकट-६

आज तात्या असते तर….

आनंदराव पाटील म्हणजे भेडसगावच्या समृद्ध घरातील आनंदवन. हे आनंदवन  आज हयात असते तर गावात अनेक गोरगरिबांच्या, सर्वसामान्यांच्या मुलांना नोकरी- रोजगार- व्यवसाय मिळाला असता.कित्येकांचे संसार उभे राहिले असते. गावामध्ये उच्चशिक्षणाची, विविध अभ्यासक्रमाची निर्मिती झाली असती.,लोकांची आर्थिक गरज भागली असती.कुणाला दवाखाना तर कुणाला शासकीय, अशासकीय कामासाठीं शब्द टाकण्याची जागा राहिली असती.पण एवढे मात्र नक्की त्यांना जाऊन २१ वर्षे लोटली,पण ‘तात्या’ नावाचे व्यक्तिमत्त्व आजही जनमाणसांच्या मनात,तोंडात,ओठात रुंजी घालून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!