जुनी पेन्शन संघटनेचे तालुक्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान- सारिका कासोटे
जुनी पेन्शन संघटनेचे तालुक्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान- सारिका कासोटे गटशिक्षणाधिकारी पं. स.कागल
जुनी पेंशन संघटना कागल तर्फे’विद्यार्थी गुणगौरव समारंभ’
कोल्हापूर/मारुती फाळके
कागल तालुक्याच्या शैक्षणिक विकासात जुनी पेंशन संघटनेचे योगदान मोलाचे असून विविध स्पर्धा परीक्षेत झोकून देऊन काम करण्यात,तसेच वेगवेगळे शैक्षणिक गुणवत्ता राखण्याचे उपक्रम राबविण्यात कागल तालुका जुनी पेंशन संघटनेचे काम नोंद घेण्यासारखे आहे,असे गौरवोद्गार कागल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी व्यक्त केले.
कागल तालुका जुनी पेंशन संघटनेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.यावेळी त्यांनी संघटनेच्या विविध विधायक उपक्रमांचे कौतुक करून संघटनेला असे शैक्षणिक गुणवत्तेचे अभिनव उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने इयत्ता चौथी व इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन जीवन शिक्षण विद्यामंदिर मुरगुड नंबर एक व कन्या शाळा मुरगुड या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी कागल तालुक्यातील इयत्ता चौथीच्या २५० विद्यार्थ्यांनी व इयत्ता सातवीच्या १५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता चौथी इयत्ता सातवीच्या प्रथम पंचवीस विद्यार्थ्यांना शिल्लड व सन्मानपत्र देऊन संघटनेमार्फत गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनीही कागल तालुका कार्यकारणीचे कौतुक करून संघटन आणखी मजबूत बनवण्यासाठी अशा विधायक कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील, शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर, पुरोगामीचे जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील त्याचबरोबर कागल तालुका समन्वय समितीचे सर्व सन्माननीय नेते यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर पिराजीराव पतसंस्थेचे संचालक विठ्ठल पाटील यांनी तर आभार महिला तालुकाध्यक्ष विजया चव्हाण यांनी मानले.कार्यक्रमास कागल तालुक्यातील कागल तालुक्याच्या जुनी पेंशन परिवारासह विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










