March 24, 2026

समाजाला गुलामीत रुतवून बसवण्याचे काम सुरू- प्रा. सुकुमार कांबळे,मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती मार्फत म.फुले व डॉ.आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा

0
IMG-20250422-WA0003

समाजाला गुलामीत रुतवून बसवण्याचे काम सुरू- प्रा. सुकुमार कांबळे
म.फुले व डॉ.आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा

कोल्हापूर/मारुती फाळके

सध्या समाजामध्ये पद्धतशीरपणे महिला व युवकांना प्रलोभने दाखवून त्यांची दिशाभूल करण्याचे काम चालू असून, संपूर्ण समाजात गुलामी रुतवुन बसवण्याचं काम सध्याची राजकीय व्यवस्था नियोजनबद्धरीत्या करत असल्याचा आरोप प्रा. डॉ. सुकुमार कांबळे यांनी केला.

ते कोल्हापूर येथे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित क्रांतीबा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी समितीचे प्रेमानंद मौर्य होते.

कांबळे म्हणाले,जात ही विकासातला सर्वात मोठा अडथळा आहे. सध्या देशामध्ये जात व धर्माच्या नावाखाली विषमतेचे विष कालवण्याचा प्रयत्न धर्मांध शक्तीकडून सातत्याने होत आहे. यासाठी सध्याच्या विशेषत: युवा पिढीने महापुरुषांच्या विचार कार्याच्या शिदोरीवर वाटचाल करणे आणि समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्माण करणे अपेक्षित आहे. गौतम बुद्धानी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला व माणसाच्या सर्वस्पर्शी सुखाचा शोध घेणारा धम्मविचार समाजाला अर्पण केला. या धम्माच्या वाटेवर समाजाने वाटचाल करणे आज काळाची गरज बनली आहे.सध्या हिंदू समाजात जातीच्या नावाखाली उच्च निचतेच्या दर्जावर ग्रेडेशनचा -डीग्रेडेशनचा उद्योग सुरू असल्याचे ते म्हणाले.भारताच्या लोकशाहीमध्ये २१वर्षावरील नागरिकांना मतदानाचा अधिकार ही मोठी देण भारतीय संविधानाने आपणास दिली आहे. यासाठी सशक्त समाज निर्मितीसाठी फुले -शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या विचार कार्याचे अनुकरण करण्याची आज समाजाला नितांत गरज असल्याचेही ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात मनोगतात प्रेमानंद मौर्य म्हणाले,जयंती महोत्सव समितीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत कार्यक्रम साकारले. सध्याच्या पिढीने महापुरुषांचे विचार आत्मसात करून कार्यरत राहण्याची काळाची गरज बनली आहे. जयंती महोत्सव आयोजित करणाऱ्या सर्व संघटना-कार्यकारिणी महापालिका प्रशासनाचे त ऋण व्यक्त केले.

यावेळी जयंती महोत्सवासाठी महापालिकडे पाठपुरावा करणाऱ्या संघटना नेते मंडळींचा यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या भूमिका साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमास समितीचे प्रेमानंद मौर्य, रघुनाथ मांढरे,भीमराव कांबळे,उत्तम कांबळे,बबन रानगे डी.जी. भास्कर,प्रा.पी.बी.अंबपकर,नामदेव कांबळे,मारुती फाळके, सागर मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव प्रधान तर आभार बाजीराव नाईक यांनी मानले.कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते-महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट-
३५० वर्षे नव्हे तर ३५० वर्षे गुलामी

खंडप्राय देश असणारा आपला भारत देश हा डच, पोर्तुगीज,त्यानंतर इंग्रज अशा कित्येक परकीय राजवटींच्या गुलामगिरी खाली होता. कारण या काळामध्ये राजघराणे सोडून कुणालाही शस्त्र उचलण्याची परवानगी नव्हती, यामुळेच परकीय सत्तांनी भारत देशावर ७५० वर्षे राज्य करून या देशातील संपत्तीची लय लूट केली,आजही पुन्हा सध्याची राजकिय व्यवस्था लोकांना गुलाम बनवू पाहत आहे,असा घणाघात कांबळे यांनी केला.

फोटो ओळी-
मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित जयंती सोहळ्यात बोलताना विचारवंत व प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ. सुकुमार कांबळे, व्यासपीठावर बाजीराव नाईक, प्रेमानंद मौर्य, रघुनाथ मांढरे,अविनाश शिंदे, वैभव प्रधान आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!