कोल्हापूरात उद्या १४ सप्टेंबर ला संविधान महोत्सव : २० भाषांमध्ये होणार भारताचे संविधान उद्देशिका सादरीकरण
कोल्हापूरात उद्या १४ सप्टेंबर ला संविधान महोत्सव : २० भाषांमध्ये होणार भारताचे संविधान उद्देशिका सादरीकरण
कोल्हापूर/प्रतिनिधी
अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनतर्फे कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात देशातील सर्वात मोठा संविधान महोत्सव उद्या १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. या विशेष उपक्रमात देशभरातून तब्बल १,५०० गायक कलाकार सहभागी होणार असून ते भारतीय संविधानाला अभिवादन करण्यासाठी २० भाषांमध्ये संविधानाचे प्रास्ताविक गीत सादर करणार आहेत.
या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेमध्ये होणार आहे. प्रास्ताविक गीत हिंदी, मराठी, इंग्रजी, पाली, संस्कृत, कन्नड, उर्दू, कोकणी, पंजाबी, गुजराती, राजस्थानी, सिंधी, भोजपुरी, असामी, नेपाळी, तेलुगु, ओडिया, मैथिली तसेच भारतीय सांकेतिक भाषेत (मूकबधिर भाषा) सादर करण्यात येणार आहे.
अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गायक-संगीतकार कबीर नाईकनवरे तसेच प्रधान सचिव, न्याय विभाग महाराष्ट्र राज्य डॉ. हर्षदीप कांबळे,हौसाई बंडू आठवले ट्रस्ट चे सतीश माळगे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
“भारतीय संविधानाला अनोखी मानवंदना!”
जगातील सर्वात मोठा लिखित लोकशाही ग्रंथ असणारे भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना भारतीय संविधानाला ही अनोखी मानवंदना ठरणार आहे. भारत देशामध्ये प्रथमच तब्बल २० भाषांमध्ये भारतीय संविधानाची उद्देशिका १५०० गायकांच्या सुरावटीतून गाण्याचा अनोखा विक्रम होत आहे.कदाचित हा भारत देशातील पहिलाच प्रयत्न असावा. या ऐतिहासिक उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेमध्ये होणार आहे.या संविधान महोत्सवासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून देशाच्या सार्वभौम संविधानाला मानवंदना देऊया.
–कबीर नाईकनवरे
सुप्रसिद्ध गायक,संगीतकार
अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशन










